सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृती काळाची गरज; नागरिकांनी सतर्क राहावे – संजोग कदम

सुरक्षित सिंधुदुर्ग सायबर साक्षर समाज निर्माण

बांदा (प्रतिनिधी) : सध्याच्या डिजिटल युगात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत असून नागरिकांनी सोशल मीडियाचा व ऑनलाइन व्यवहारांचा वापर करताना अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन अॅड. संजोग कदम यांनी बांदा पोलीस ठाण्यात आयोजित सायबर क्राईम जनजागृती मार्गदर्शन कार्यक्रमात केले.

या कार्यक्रमाला परिसरातील पोलीस पाटील, ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये सायबर फसवणुकीचे विविध प्रकार, मोबाईल हॅकिंग, बनावट लिंक,ओटीपी फसवणूक, सोशल मीडिया ब्लॅकमेलिंग तसेच बँक खात्यांमधील ऑनलाईन फसवणूक याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

यावेळी अॅड. संजोग कदम म्हणाले, “आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, पण त्यासोबत सायबर सुरक्षेचे ज्ञान असणे तितकेच महत्त्वाचे आहे. अनेक नागरिक अज्ञानामुळे फसवणुकीला बळी पडतात. कोणालाही ओटीपी, बँक डिटेल्स किंवा वैयक्तिक माहिती देऊ नये.” ते पुढे म्हणाले, “सुरक्षित सिंधुदुर्ग आणि सायबर साक्षर समाज निर्माण व्हावा यासाठी आम्ही सातत्याने जनजागृतीचे काम करत आहोत. प्रत्येक गावात, शाळांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी सायबर क्राईमविरोधात जागृती होणे आवश्यक आहे. नागरिकांनी जागरूक राहिल्यास अनेक गुन्हे रोखता येऊ शकतात.” कार्यक्रमात ऑनलाईन फसवणूक झाल्यास त्वरित १९३० हेल्पलाईनवर संपर्क साधावा तसेच जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असे आवाहनही करण्यात आले.

उपस्थित पोलीस पाटील यांनीही गावपातळीवर सायबर जनजागृती मोहिम राबविण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले. आभार पोलीस निरीक्षक पंकज शिंदे यांनी मानले.

error: Content is protected !!