मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे आदेश
कणकवली (प्रतिनिधी) : शिक्षण प्रसारक मंडळ कणकवली या संस्थेची नविन कार्यकारिणी निवडण्याची निवडणूक ३१ ऑगस्ट २०२६ पुर्वी घेण्यात यावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे न्यायाधिश माधव जामदार व प्रविण पाटील यांनी सहाय्यक धर्मदाय आयुक्त सिंधुदुर्ग यांना दिले. त्यामुळे शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणूकीचा मार्ग मोकळा झाला आहे. उच्च न्यायालयात शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने ऍड. श्रीकृष्ण गणबावले, ऍड. उमेश सावंत व ऍड. अद्वेत वजराटकर यांनी काम पाहिले.
सन २०२६ ते २०२८ या वर्षाकरीता संस्थेच्या घटनेप्रमाणे पारदर्शक पद्धतीने नविन कार्यकारिणी नेमण्यासाठी सहाय्यक धर्मदाय आयुक्त सिंधुदुर्ग यांच्याकडे संस्थेने ऍड. उमेश सावंत यांच्यावतीने अर्ज केला होता. त्या अर्जाला सदानंद हर्णे व रुपेश मुसळे यांनी हरकत घेतली होती. मात्र, तो अर्ज मंजूर करण्यात आला आणि संस्थेची निवडणूक घेण्यासाठी निरीक्षक म्हणून दत्तराज सावंत यांची नियुक्ती करण्यात आली. याचवेळी रुपेश मुसळे यांनी संस्थेविरूद्ध सभासद यादीबाबत चौकशीसाठी धर्मदाय आयुक्तांकडे स्वतंत्र अर्ज केला, तोही फेटाळण्यात आला. दरम्यान, निवडणूक अधिकारी यांनी निवडणूक कार्यक्रम जाहिर केला असता रुपेश मुसळे यांनी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये धाव घेत सभासद यादीबाबत चौकशीसाठी रिट याचीका दाखल केली. सुनावणीअंती धर्मदाय आयुक्त सिंधुदुर्ग यांच्या २८ जानेवारी २०२६ रोजीच्या निवडणूक घेण्याच्या निकालाप्रमाणे ३१ ऑगस्ट २०२६ पुर्वी नविन कार्यकारिणीची निवडणूक प्रक्रिया निरीक्षक दत्तराज सावंत यांच्यामार्फत पुर्ण करावी. तसे करताना याचीकादार रुपेश मुसळे यांच्या अर्जावर सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी दिलेला निकाल विचारात घेऊ नये, असे निर्देश दिले आहेत. याप्रकरणी संस्थेच्यावतीने सचिव विजयकुमार वळंजू, सतीश नाईक, हेमंत गोवेकर, मंदार सापळे यांनी विशेष मेहनत घेतली.











