फोंडाघाटच्या मनस्या फाले हिला ‘बेस्ट कॅडेट’ स्कॉलरशिप प्रदान; राष्ट्रीय स्तरावरील ‘गोल्ड मेडल’ कामगिरीचे सार्थक
फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी, फोंडाघाट संचलित न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजची राष्ट्रीय छात्र सेना (NCC) विभागाची कॅडेट सार्जंट मनस्या निलेश फाले हिला ५८- महाराष्ट्र बटालियन एनसीसी सिंधुदुर्ग येथे कमांडिंग ऑफिसर कर्नल अजयराज एल. यांच्या शुभहस्ते कोल्हापूर ग्रुप अंतर्गत प्रतिष्ठेची ‘बेस्ट कॅडेट’ स्कॉलरशिप प्रदान करण्यात आली. ५८ महाराष्ट्र बटालियन एनसीसी सिंधुदुर्ग (ओरोस) येथे आयोजित विशेष कार्यक्रमात बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अजयराज एल.यांच्या हस्ते सार्जंट मनस्या फाले हिला ही बेस्ट कॅडेटची स्कॉलरशिप देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना कर्नल अजयराज यांनी मनस्याने ‘स्नॅप शूटिंग’मध्ये राष्ट्रीय स्तरावर मिळविलेल्या अभूतपूर्व सुवर्णपदकाचा (Gold Medal) विशेष गौरव केला आणि तिची ही कामगिरी इतर कॅडेट्ससाठी अत्यंत प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
याप्रसंगी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर लेफ्टनंट तनुज मंडलिक यांनी मनस्याचे कौतुक करताना, तिने हे यश मिळवण्यासाठी घेतलेल्या कठोर कष्टांची आणि शिस्तीची ओळख सध्याच्या चालू फायरिंग टीमला करून दिली. राष्ट्रीय स्तरावर चमकण्यासाठी किती सातत्य लागते, याचे उदाहरण त्यांनी कॅडेट्ससमोर ठेवले. या कार्यक्रमाप्रसंगी सुभेदार मेजर कुलदीपकर, ए. एन.ओ., सर्व पी.आय. स्टाफ तसेच ५८ महाराष्ट्र बटालियन एन. सी. सी सिंधुदुर्गचा सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होता. सर्वांनी मनस्याच्या या उत्तुंग यशाचे कौतुक करून तिला पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. मनस्याला मिळालेला हा बेस्ट कॅडेटचा सन्मान न्यू इंग्लिश स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज फोंडाघाट या प्रशालेसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. तिच्या या ऐतिहासिक यशाबद्दल फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी,शाळा समिती चेअरमन, यांच्यासह संस्थेच्या सर्व मा.संचालकांनी तिचे विशेष अभिनंदन केले.तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. पी. के. पारकर, पर्यवेक्षक व्ही. पी. राठोड, एनसीसी विभागाचे ऑफिसर आर्या भोगले, एम. डी. लाड, ए. व्हि. पोफळे, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी मनस्यावर कौतुकाचा वर्षाव करत तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मनस्याच्या या यशामुळे फोंडाघाट पंचक्रोशीतून तिचे हार्दिक कौतुक होत आहे.

सार्जंट मनस्या











