औषध विक्रेत्यांच्या बंद ला वैभववाडीत शंभर टक्के प्रतिसाद

वैभववाडी (प्रतिनिधी) : अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेच्या देशव्यापी आंदोलनाला वैभववाडी तालुक्यात 100 टक्के प्रतिसाद मिळाला आहे. वैभववाडीतील औषध विक्रेत्यांनी बुधवारी दिवसभर आपली दुकाने बंद ठेवली. ऑनलाइन औषध विक्री, कॉर्पोरेट कंपन्यांची वाढती मक्तेदारी आणि औषध व्यवसायातील असमतोल स्पर्धेविरोधात हा बंद संपूर्ण राज्यात पुकारण्यात आला होता.

वैभववाडी तालुक्यात एकूण 25 मेडिकल आहेत. यात वैभववाडी बाजारपेठ, उंबर्डे, भुईबावडा, हेत शेवरी येथील दुकानांचा समावेश आहे. बुधवारी दिवसभर मेडिकल बंद राहिल्याने अनेक रुग्णांचे हाल झाले.  डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे रुग्णांना मिळू शकली नाही. त्यामुळे रूग्ण व नातेवाईकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

औषध व्यवसाय हा ड्रग अँड कॉस्मेटिक अॅक्ट 1945 अंतर्गत चालतो. मात्र, ऑनलाइन औषध विक्रीसंदर्भात अद्याप स्पष्ट व कायदेशीर तरतूद करण्यात आलेली नाही.

कोरोना काळात होम डिलिव्हरीसाठी देण्यात आलेल्या विशेष सवलतींचा गैरफायदा घेत काही ऑनलाइन कंपन्या मोठ्या प्रमाणावर औषध विक्री करत असल्याचा आरोपही संघटनेने केला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील पारंपरिक औषध वितरण व्यवस्थेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व मेडिकल दुकाने बंद ठेवण्यात आली होती. जिल्ह्यात ही या बंद ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

error: Content is protected !!