ओरोस (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा केंद्रात एका दहावीच्या विद्यार्थ्याचे ९ पैकी ७ पेपरला जोडल्या गेलेल्या पुरवणीच्या अक्षरांमध्ये बदल आढळून आले आहेत. त्याबाबतची चौकशी कोकण बोर्डाने सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत केली आहे. त्यांनी बोर्डाला अहवाल सादर केला आहे. त्यानंतर बोर्डाने १३ मे २०२६ रोजी माध्यमिक शिक्षण विभागाला पत्र पाठवीत याबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे, अशी माहिती गुरुवारी झालेल्या शिक्षण समिती सभेत या प्रकरणाचे चौकशी अधिकारी तथा उपशिक्षणाधिकारी संजय माने यांनी दिली.
दैनिक सकाळने १९ मे रोजी वैभववाडी तालुक्यातील एका परीक्षा केंद्रात थेट ‘शिक्षकांनीच सोडविला दहावीचा पेपर’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध झाली होती. त्याचे तीव्र पडसाद गुरुवारी झालेल्या शिक्षण समिती सभेत उमटले. जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे यांनी हा विषय आयत्या वेळेच्या विषय चर्चेच्यावेळी सभागृहात मांडत याबाबत माध्यमिक शिक्षण विभागाने खुलासा करावा, अशी मागणी केली. यामध्ये यज्ञा साळगावकर, प्राची इस्वलकर, रामा गवस, नितीन राऊळ यांच्यासह शिक्षण सभापती तथा सभाध्यक्ष प्रितेश राऊळ, सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब यांनी सहभाग घेतला.
यावेळी सभागृहाने याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. रावराणे यांनी मार्च महिन्यात दहावीची परीक्षा संपली. मग एवढ्या दिवसांनी चौकशी का लागली. एवढ्या दिवसांत हा गंभीर विषय जिल्हा परिषद अध्यक्ष, शिक्षण सभापती यांच्या कानावर घातलात का ? असे अनेक प्रश्न माध्यमिक विभागाला विचारले. मात्र, शिक्षण सभापती राऊळ यांनी सैनिक सकाळ मध्ये याबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर आपल्याला समजले, असे सभागृहात स्पष्ट केले. यावेळी रावराणे यांनी थेट शिक्षकांनीच विद्यार्थ्याचा पेपर सोडविला आहे. ते पेपर परीक्षा केंद्रात सोडविले गेले की केंद्राच्या बाहेर ? या परीक्षेला सर्व केंद्रांमध्ये सीसीटीव्ही बसविले होते. मग त्याचे पुटेज चेक केलात का ? असे अनेक प्रश्न उपस्थित केले. मात्र, यावर माध्यमिक विभागाकडे उत्तर नव्हते.











