दोषींवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी;अन्यथा आंदोलनाचा इशारा
वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा केंद्रावर दहावीच्या परीक्षेदरम्यान एका विध्यार्थ्यांचे नऊ पैकी तब्बल सात पुरवणी उतरपत्रिका अन्य व्यक्ती कडून लिहून घेतल्याचे बोर्डाच्या तपासात स्पष्ट झाले आहे. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आक्रमक झाला आहे. शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या संबंधित दोषींवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावे, अशी जोरदार मागणी शिवसेनेचे तालुका सचिव गुलजार काझी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुका हा कष्टाळू विद्यार्थ्यांचा आणि ‘कोकण पॅटर्न’चा अभिमान बाळगणारा तालुका म्हणून ओळखला जातो. आजपर्यंत येथील शिक्षण क्षेत्रावर कॉपीचे गालबोट लागले नव्हते. मात्र, स्वतःला गुरुजी म्हणवणाऱ्या काही भ्रष्ट प्रवृत्तींनी दहावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांचे पेपर स्वतः लिहून शिक्षण व्यवस्थेलाच काळिमा फासल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा प्रकार म्हणजे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या, भविष्याशी केलेला विश्वासघात असून, त्यामुळे तालुक्याची व जिल्ह्याची प्रतिमा राज्यभर मलीन झाली असल्याचेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. शिक्षण विभागाने केवळ चौकशीचा फार्स न करता या प्रकरणातील सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणात दोषींना पाठीशी घालण्याचा किंवा कारवाईत दिरंगाई करण्याचा प्रयत्न झाल्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन छेडेल, असा इशाराही काझी यांनी दिला आहे.










