मौदे गावातील पाणीटंचाईला तात्पुरता दिलासा…

जलजीवन मिशनच्या विहिरीतील गाळ काढून ग्रामस्थांना उपलब्ध केले पिण्याचे पाणी

वैभववाडी (प्रतिनिधी) : सध्या तालुक्यात तीव्र उन्हाळ्याची झळ जाणवत असून मौदे गावात पाणी टंचाईचा सामना ग्रामस्थांना करावा लागत होता. जलजीवन मिशन अंतर्गत बांधण्यात आलेल्या विहिरीतील गाळ काढून ती स्वच्छ करण्यात आल्याने ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध झाले आहे. ठेकेदाराने पुढाकार घेत ही कामगिरी केल्यामुळे ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

मौदे गावात जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजनेचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. मात्र संबंधित ठेकेदारांची शासकीय बिले रखडल्यामुळे तालुक्यातील इतर गावांप्रमाणेच येथेही योजनेची कामे संथ गतीने सुरू आहेत. त्यामुळे गावातील नागरिकांना अद्यापही नियमित पाणीपुरवठ्याचा लाभ मिळू शकलेला नाही. दरम्यान, उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत होती. ही परिस्थिती लक्षात घेऊन ग्रामस्थांनी संबंधित ठेकेदार यांच्याकडे जलजीवन मिशन अंतर्गत बांधण्यात आलेल्या आरसीसी विहिरीतील गाळ काढून ती स्वच्छ करण्याची मागणी केली होती. विहिरीतील पाणी पिण्यासाठी वापरता येईल, असे ग्रामस्थांनी त्यांना सांगितले. ग्रामस्थांची अडचण ओळखून ठेकेदार राजेंद्र कारंडे यांनी तत्काळ पुढाकार घेत संपूर्ण विहीर उपसून तिची स्वच्छता केली. विहिरीतील गाळ काढण्यात आल्याने पाण्याची उपलब्धता वाढली असून ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याचा तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

या कामामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत ठेकेदारांचे आभार मानले आहेत.याबाबत माहिती देताना माजी सरपंच दत्ताराम मोरे यांनी सांगितले की, “गावातील पाणीटंचाईची समस्या गंभीर बनली होती. अशा वेळी ठेकेदारांनी सामाजिक बांधिलकी जपत विहीर स्वच्छ करून दिल्याने ग्रामस्थांना मोठा आधार मिळाला आहे.” दरम्यान, जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेली रखडलेली कामे तातडीने पूर्ण व्हावीत, यासाठी शासनाने संबंधित ठेकेदारांची प्रलंबित बिले त्वरित अदा करावीत, अशी मागणीही माजी सरपंच दत्ताराम मोरे यांनी केली आहे.

error: Content is protected !!