तब्बल २४ तासांच्या शोधानंतर चैतन्यचा मृतदेह सापडला

मिठमुंबरी बौद्धवाडी येथील कांदळवन क्षेत्रात आढळला मृतदेह

पर्यटनासाठी आलेल्या युवकावर काळाचा घाला

देवगड (प्रतिनिधी) : तारामुंबरी-बागवाडी येथील समुद्रात पर्यटक युवक बुडाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सायंकाळी घडली होती. तब्बल २४ तासांच्या शोधमोहीमेनंतर सोमवारी सायंकाळी संबंधित युवकाचा मृतदेह मिठमुंबरी बौद्धवाडी येथील कांदळवन क्षेत्रात आढळून आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मुंबईतील दादर-नायगाव येथील पाच मित्र पर्यटनासाठी देवगड येथे आले होते. रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास मिठमुंबरी- बागवाडी समुद्रकिनारी यातील चार युवक समुद्रात पोहण्यासाठी उतरले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने चौघेही अचानक बुडू लागले. त्यांच्या आरडाओरडीनंतर स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेत बचावकार्य सुरू केले. यात तिघा युवकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. मात्र चैतन्य राजाराम गुरव हा युवक समुद्रात बेपत्ता झाला होता.

घटनेनंतर प्रशासनाकडून युवकाचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले. सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून मत्स्य विभागाच्या माध्यमातून ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने समुद्र परिसरात शोधमोहीम राबविण्यात आली. दिवसभर शोधकार्य सुरू असूनही सायंकाळी पाच वाजेपर्यंत युवकाचा शोध लागला नव्हता.
दरम्यान, सायंकाळी पाचनंतर मिठमुंबरी बौद्धवाडी येथील कांदळवन क्षेत्रात कांदळवन सफारीसाठी गेलेल्या पर्यटकांना तसेच स्थानिक मच्छीमारांना एक मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. त्यांनी तत्काळ लक्ष्मण तारी तसेच पोलीस पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर होडीच्या सहाय्याने मृतदेह किनाऱ्यावर आणण्यात आला. मृतदेहाची ओळख युवकाचे वडील यांनी चैतन्य राजाराम गुरव अशी पटविली.

त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णवाहिकेतून देवगड ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. यावेळी तहसीलदार रमेश पवार, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण,रवींद्र महाले,आशिष कदम,संतोष भालेराव,ग्रामसेवक रेश्मा गोळवणकर, रमेश तारी,दयानंद मुंबरकर,हेमंत तोडणकर, कदम नाईक, सुजित नाईक, पोलीस कर्मचारी तसेच स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!