विजयदुर्ग ते वेंगुर्ला सहा सागरी पोलीस ठाण्यांमध्ये नियुक्ती; विशेष प्रशिक्षणानंतर जवानांची तैनाती
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनीधी) : पर्यटन, मत्स्यव्यवसाय आणि संवेदनशील सागरी क्षेत्रामुळे राज्यात महत्त्वाचे स्थान असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी जिल्हा पोलिस दलाने ६० मरीन होमगार्डची नियुक्ती केली आहे. विशेष प्रशिक्षण पूर्ण केलेल्या या जवानांना आजपासून जिल्ह्यातील सहा सागरी पोलीस ठाण्यांमध्ये कर्तव्यावर रुजू करण्यात आले आहे.
सागरी किनारपट्टीवरील सुरक्षा व्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर पोलीस दलाला सक्षम सहकार्य मिळावे या उद्देशाने “मरीन होमगार्ड” ही संकल्पना राबविण्यात येत आहे. त्यानुसार विजयदुर्ग, देवगड, आचरा, मालवण, निवती आणि वेंगुर्ला या सहा सागरी पोलीस ठाण्यांसाठी प्रत्येकी दहा अशा एकूण ६० मरीन होमगार्डची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्ह्याच्या किनारी भागात वास्तव्यास असलेल्या आणि पोहण्याचे कौशल्य असलेल्या स्थानिक युवकांची या पदासाठी निवड करण्यात आली आहे. हे जवान बंदरे, जेट्टी, लँडिंग पॉइंट, सागरी किनारे आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा व देखरेखीची जबाबदारी सांभाळणार आहेत. सिंधुदुर्गच्या सागरी सुरक्षेसाठी उचलण्यात आलेले हे पाऊल महत्त्वपूर्ण मानले जात असून, स्थानिक युवकांच्या सहभागामुळे सुरक्षा यंत्रणा आणि नागरिक यांच्यातील समन्वय अधिक दृढ होणार आहे.
अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व मरीन होमगार्डना दोन दिवसांचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले. सागरी सुरक्षेचे महत्त्व, किनारपट्टीवरील दक्षता, संशयित बोटींची ओळख, बोर्डिंग ऑपरेशन, सागरी गस्तीदरम्यानची कर्तव्ये, वायरलेस कम्युनिकेशन, जीपीएस व नेव्हिगेशन, शोध व बचाव कार्य, जेमिनी बोट व इंजिन हाताळणी, सायबर गुन्हे, आपत्ती व्यवस्थापन, गुप्तवार्ता संकलन, अग्निशमन तसेच प्रथमोपचार आणि सीपीआर यांसारख्या विषयांवर तज्ज्ञ प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केले.
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सर्व ६० मरीन होमगार्डना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी जवानांचे अभिनंदन करून सागरी सुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी त्यांच्या योगदाना बाबत अपेक्षा व्यक्त केल्या. आज सकाळी आठ वाजता सर्व जवानांना त्यांच्या नियुक्त सागरी पोलीस ठाण्यांकडे रवाना करण्यात आले. या उपक्रमामुळे जिल्ह्याच्या विस्तीर्ण किनारपट्टीवरील सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत होण्यास मदत होणार असून, संशयास्पद हालचालींवर प्रभावी नजर ठेवणे, आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत पोहोचविणे आणि सागरी सुरक्षेबाबत जनजागृती वाढविणे शक्य होणार आहे.














