घटस्फोटित पत्नीला पेट्रोल ओतून जिवंत जाळणाऱ्या सुशांत गोवेकर चा जामीन पुन्हा फेटाळला

सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद

ओरोस (प्रतिनिधी) : स्वतःपासून घटस्फोट घेतलेल्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळणाऱ्या सुशांत सहदेव गोवेकर (रा.धुरिवाडा, मालवण) याचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांनी नामंजूर केला. याकामी सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील रुपेश देसाई यांनी यशस्वी युक्तिवाद केला. मयत घटस्फोटापूर्वीची सौभाग्यश्वरी हिने आरोपी सुशांत गोवेकर सोबत घटस्फोट घेऊन सिद्धांत बिळवस्कर याच्याशी लग्न केले होते. प्रीती बिळवस्कर ही मालवण एस.टी स्टँडसमोरील लॅब मध्ये काम करत असताना 25 सप्टेंबर 2024 रोजी मयत प्रीती हिच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जाळले होते. गंभीर जखमी झालेल्या प्रीतीचे उपचारादरम्यान निधन झाले होते. या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपी सुशांत याने जामिनावर मुक्तता होण्यासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जाच्या सुनावणीवेळी सरकारी वकील रुपेश देसाई यांनी आरोपी सुशांत च्या जामीन अर्जाला हरकत घेतली. आरोपी सुशांत खुनशी वृत्तीचा असून त्याने निर्घृणपणे पेट्रोल डोक्यावर ओतून प्रीती हिला जाळले होते. वैद्यकीय उपचारादरम्यान मयत प्रीती ने मेडिकल ऑफिसरसमोर आरोपी सुशांत याने तिच्या डोक्यावर पेट्रोल ओतून लायटर ने आग लावल्याचे सांगितले आहे. तशी नोंद एमएलसी रजिस्टर मध्ये आहे. गुन्हा करून आरोपी घटनास्थळावरून पळून गेला होता. जामीन मिळाल्यास तो पंच साक्षीदार यांच्यावर दबाव आणू शकतो आदी मुद्दे मांडून आरोपी सुशांतला जामीन मंजूर करू नये असा युक्तिवाद केला. सरकारी वकील रुपेश देसाई यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ देशपांडे यांनी आरोपी सुशांत गोवेकरचा जामीन अर्ज फेटाळला.

ऍड.रुपेश देसाई

error: Content is protected !!