अन्नसुरक्षा कायदे व नियमांची व्यापाऱ्यांना सविस्तर माहिती
८००पेक्षा अधिक व्यापाऱ्यांची उपस्थिती
तळेरे (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने अन्नसुरक्षा प्रशासनाच्या बदललेल्या नियम व कायद्यांविषयी मार्गदर्शन करण्यासाठी अन्नसुरक्षा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. कुडाळ येथील मराठा हॉलमध्ये झालेल्या या शिबिराला जिल्हाभरातील सुमारे ८०० व्यापारी बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी अन्नसुरक्षा प्रशासनाचे जिल्हा निरीक्षक अभय चंदनशिवे, कु. ताजने मॅडम, गावित साहेब यांनी व्यापाऱ्यांना अन्नसुरक्षा कायद्यांतील बदल, आवश्यक प्रमाणपत्रे, नियमांचे पालन आणि होणाऱ्या कारवाईबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. व्यासपीठावर महासंघाचे कार्यवाह राजू जठार, कोषाध्यक्ष ॲड. नंदन वेंगुर्लेकर, उपाध्यक्ष अवधूत शिरसाट, दीपक भोगले, माजी नगराध्यक्ष श्री. तेली, सहकार्यवाह राजन नाईक, माजी अध्यक्ष नितीन वाळके, द्वारकानाथ घुर्ये, प्रकाश वाळके, कुडाळ तालुका अध्यक्ष पी. डी. शिरसाट, संजय भोगटे आदी उपस्थित होते.
(अन्नसुरक्षा कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे शासनस्तरावरुन आदेश: सतर्क राहण्याचे आवाहन)
अन्न व औषध प्रशासनाचे नवे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अन्नसुरक्षा कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना नव्या नियमांची माहिती व्हावी, या उद्देशाने या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. मार्गदर्शनावेळी व्यवसायाच्या ठिकाणी नियमित पेस्ट कंट्रोल करून त्याचे प्रमाणपत्र लावणे, अन्नसुरक्षा परवाना बंधनकारक ठेवणे, मुदतबाह्य वस्तू स्वतंत्रपणे ठेवणे, पिण्याच्या पाण्याची सहा महिन्यांतून एकदा तपासणी करणे, ग्लोव्हज, एप्रन व कॅप्सचा वापर करणे, शाकाहारी व मांसाहारी अन्न वेगवेगळे साठवणे, ग्राहकांना मोफत सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, वर्तमानपत्र किंवा छापील कागदात अन्नपदार्थ न देणे, अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची वार्षिक वैद्यकीय तपासणी करणे, धूम्रपान व थुंकण्यास बंदी तसेच वापरलेल्या खाद्यतेलाचा पुनर्वापर न करणे अशा महत्त्वाच्या नियमांची माहिती देण्यात आली. याशिवाय अन्नसुरक्षा प्रमाणपत्र, प्रशिक्षण प्रमाणपत्र, वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र, पिण्याच्या पाण्याच्या तपासणीचा दाखला आणि पेस्ट कंट्रोलचे प्रमाणपत्र दुकानाच्या दर्शनी भागात लावणे आवश्यक असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन वाळके यांनी केले, तर स्वागत व आभार प्रदर्शन राजू जठार यांनी केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी कुडाळ तालुका अध्यक्ष पी. डी. शिरसाट, राजन नाईक आणि सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

३०/६/२०२६
कुडाळमध्ये अन्नसुरक्षा प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न झाले…












