सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार – भाजपा युवा नेते विशाल परब यांचे आश्वासन
बांदा (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यासह सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या विविध समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी भारतीय जनता पक्ष कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेऊन संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेण्यात येईल आणि आवश्यक निर्णय त्वरित घेतले जातील. असे आश्वासन पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले. यासंदर्भात भाजपा महाराष्ट्र युवा नेते विशाल परब यांनी मुंबई येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची भेट घेऊन सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील विविध समस्या, नागरिकांच्या अडचणी तसेच अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भागांबाबत सविस्तर निवेदन सादर केले. निवेदनामध्ये रस्ते, पूल, वीजपुरवठा, मोबाईल नेटवर्क, पाणीपुरवठा तसेच पावसामुळे विस्कळीत झालेल्या मूलभूत सुविधांबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. या सर्व प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घेत प्रशासनाला आवश्यक सूचना देण्यात येतील, अशी ग्वाहीही यावेळी देण्यात आली. “जनतेच्या प्रत्येक अडचणीच्या वेळी भारतीय जनता पक्ष त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करणार आहोत,” असा निर्धार भाजपा युवा नेते विशाल परब यांनी व्यक्त केला.











