वैभववाडी (प्रतिनिधी) : तिथवली विभागातील वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारा विरोधात आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी बुधवारी दुपारी तब्बल पाच तास धरणे आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. जोपर्यंत तुमचे वरिष्ठ अधिकारी येत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. अखेर दुपारी ३. ३०वाजता वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता जयंतीलाल भांबरे यांनी वैभववाडी येथे येऊन आंदोलन कर्त्या ग्रामस्थांशी चर्चा करून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना केली जाईल. असे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
गेले काही दिवस तिथवली व तिथवली परिसरातील गावातील वीज पुरवठा वारंवार खंडित होतं आहे. यामुळे वीज ग्राहकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. वीज वारंवार खंडित होत असल्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेती पंपांवरही त्याचा परिणाम होत आहे. याबाबत वारंवार तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नव्हती.
त्यामुळे तिथवली परिसरातील ग्रामस्थांनी माजी सभापती नासिर काझी यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी दुपारी ११. ४५ वाजता वैभववाडी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली. मात्र स्थानिक वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यांकडून ग्रामस्थांना समाधानकारक उत्तरे मिळाले नाहीत. त्यामुळे ग्रामस्थ अधिक संतप्त झाले. त्यांनी जोपर्यंत वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता येथे येत नाहीत तोपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्याचा इशारा दिला. अखेर सायंकाळी साडेतीन वाजता वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता श्री भांबरे हे आंदोलन स्थळी आले. त्यांनी आंदोलन कर्त्या ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी कार्यकारी अभियंता समोरच वीज वितरण कंपनीच्या कारभाराचे आंदोलकांनी वाभाडे काढले.
वैभववाडीचे उपाभियंता श्री चव्हाण यांची बदली होऊन महिना झाला तरी त्यांच्या जागेवर दुसरे अभियंता आलेले नाही. जर बदली झालेले अधिकारी येथे आले नाही तर त्यांना का सोडले? असा प्रश्न सभापती सिद्धेश रावराणे यांनी केला. तर लवकरच त्यांच्या जागी अधिकारी हजर होतील. असे सांगितले. हजर होणार नाहीत त्यांना नोटीस काढली असल्याचे कार्यकारी अभियंता यांनी सांगितले.
तसेच जे वायरमन योग्य पद्धतीने काम करत नसतील लोकांची उद्धट वागत असतील अशांना नोटीस काढा जर ऐकत नसतील तर त्यांना कामावरून काढून टाका असे आदेश कार्यकारी अभियंता यांनी दिले.भुईबवाडा विभागात जीर्ण वीज खांब, जीर्ण वीज वहिण्या आहेत. यामुळे अपघात घडण्याची शक्यता आहे. वारंवार तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.अपघात घडून जीवितहानी होण्याची वाट पाहता काय? असा प्रश्न काझी केला.
पावसाळ्यापूर्वी करायची कामे जर केली असती तर हा प्रश्न आला नसता त्यामुळे तातडीने वीज वाहिनीवरील झाडे तोडण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
खारेपाटण विभागातील शर्पे येथून तिथवली लाईन आलेली आहे. या विभागात काही प्रॉब्लेम झाला तर त्या लाईन वरून तिथवली विभागातील गावांना वीज पुरवठा करता येईल त्या दृष्टीने मागणी करूनही दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप पाहिजे यांनी केला तर यासाठीचा तातडीने सर्वे करून त्याचा अहवाल पुढच्या मीटिंगमध्ये देण्याची सूचना कार्यकारी अभियंत्यांनी कनिष्ठ अभियंता केले. यावेळी पंचायत समिती सदस्य सुवर्णा संसारे, महेश संसारे,इब्राहिम काझी, जयराज हरियाण,महादेव हरयाण,ओंकार हरयाण,अनिकेत कुडतरकर,मजीद सोलकर, रोहिण कुडाळकर,विजय कुडतरकर,अनिल हरयाण यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.









