वैभववाडी (प्रतिनिधी) : सेवाज्येष्ठ शिक्षकांच्या सेवेचा अवमान करणारे १४ मे २०२६ रोजी शिक्षण संचालक (पुणे) यांनी काढलेले पत्र रद्द करावे, तसेच अन्य प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक संघटनांच्या वतीने गुरुवारी राज्यव्यापी शाळाबंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला वैभववाडी तालुक्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला.
तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या एकूण ९३ शाळांपैकी ४२ शाळा पूर्णपणे बंद राहिल्या, तर ५१ शाळांमध्ये अध्यापन सुरू होते. जिल्हा परिषदेतील एकूण १८८ शिक्षकांपैकी १२६ शिक्षक आंदोलनात सहभागी झाले. मात्र, शिक्षण सेवकांनी या आंदोलनात सहभाग घेतला नाही.
दरम्यान, तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळा नियमित सुरू होत्या. या शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आंदोलनाला नैतिक पाठिंबा दर्शवित काळ्या फिती लावून आपली कर्तव्ये पार पाडली. त्यामुळे तालुक्यात या आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.











