कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांची तत्परता ; विद्यार्थी व वाहनचालकांना दिलासा
कणकवली (प्रतिनिधी) : मुसळधार पावसामुळे तरंदळे येथील ब्रिजखाली आणि एस. एम. हायस्कूल सर्व्हिस रोड परिसरात पावसाचे पाणी व चिखल मोठ्या प्रमाणात साचल्याने वाहनचालक, पादचारी आणि विशेषतः शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधल्यानंतर कलमठचे सरपंच संदीप मेस्त्री यांनी तातडीने दखल घेत युद्धपातळीवर उपाययोजना राबवत परिसरातील पाणी, चिखल आणि झाडी हटवून मार्ग मोकळा करून दिला. त्यांच्या या तत्पर कारवाईमुळे तरंदळे ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत असून सरपंच संदीप मेस्त्री आणि सामाजिक कार्यकर्ते अमित सावंत यांचे आभार मानले जात आहेत.
तरंदळे ब्रिजखाली पावसाचे पाणी थेट रस्त्यावर साचत असल्याने त्या ठिकाणी अक्षरशः नदी-नाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. परिणामी दुचाकी, रिक्षा तसेच चारचाकी वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. अनेक वाहनचालकांना पाण्यातून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत होती. याचबरोबर एस. एम. हायस्कूल सर्व्हिस रोडलगतच्या फुटपाथवर मोठ्या प्रमाणात गवत व झाडी वाढल्याने शालेय विद्यार्थ्यांना चालताना अडथळे निर्माण झाले होते.
या गंभीर समस्येबाबत तरंदळे येथील सामाजिक कार्यकर्ते अमित सावंत तसेच एस. एम. हायस्कूलमधील विद्यार्थ्यांचे पालक दिनेश सावंत, प्राची सावंत, ओंकार सावंत, अक्षय राणे, साईल, दीप सावंत, अवि खरात, दीपक दळवी, रमाकांत देवलकर, तुकाराम मेस्त्री आणि पप्या राणे यांनी कलमठचे सरपंच संदीप मेस्त्री यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून तरंदळे ब्रिजखाली मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी आणि चिखल साचल्याची माहिती दिली.
या तक्रारीची गंभीर दखल घेत सरपंच संदीप मेस्त्री यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने यंत्रणा कामाला लावली. त्यांनी संबंधित ठिकाणची पाहणी करून गटाराचे चेंबर त्वरित साफ करून घेतले. तसेच पादचारी मार्गावरील वाढलेले गवत व झाडी हटवून फुटपाथ स्वच्छ आणि सुस्थितीत करून घेतला. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास मदत झाली असून वाहनचालक आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कर्तव्यदक्ष आणि तत्परतेने काम करणारे कलमठचे सरपंच संदीप मेस्त्री तसेच समस्या मांडून तिच्या निराकरणासाठी पुढाकार घेणारे सामाजिक कार्यकर्ते अमित सावंत यांचे तरंदळे ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.









