वैभववाडी (प्रतिनिधी) : भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास नाधवडे फाटा येथे घडली. चेतन परशुराम इस्वलकर (रा. नाधवडे) असे जखमी तरुणाचे नाव असून त्याच्यावर कणकवली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर डंपरसह घटनास्थळावरून पसार झालेल्या चालकाचा पोलिसांनी पाठलाग करून तरेळे येथे ताब्यात घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार, रणजित शिंदे (रा. कर्नाटक) हा कोल्हापूरहून वाळू घेऊन डंपरने तरेळेच्या दिशेने जात होता. त्याचवेळी चेतन इस्वलकर हे दुचाकीवरून वैभववाडीकडे येत होते. नाधवडे फाटा येथे भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात इस्वलकर गंभीर जखमी झाले. मात्र, अपघातानंतर चालकाने वाहन न थांबवता डंपरसह पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच तरेळे येथे ड्युटीवर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश गवस, पोलीस हवालदार बिर्जे, पोलीस नाईक खडपकर आणि सागर परब यांनी तत्काळ पाठलाग करून तरेळे येथे डंपरसह चालकाला ताब्यात घेतले. त्यानंतर चालकाला पुढील कारवाईसाठी वैभववाडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान, चालकाने मद्यप्राशन करून वाहन चालविले होते का, याची खातरजमा करण्यासाठी वैभववाडी पोलिसांनी त्याची वैद्यकीय चाचणी केली आहे. जखमी चेतन इस्वलकर यांना नातेवाईकांनी तातडीने कणकवली येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
भरधाव डंपरचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
या अपघातामुळे भरधाव वेगाने वाहने चालविणाऱ्या ट्रक व डंपर चालकांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अशा बेदरकार वाहनचालकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.











