ओरोस (प्रतिनिधी) : जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या सहा महिन्यांच्या मुलीचा परित्याग केल्याप्रकरणी सिंधुदुर्गनगरी येथील द्वितीय अति मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने आई-वडिलांना प्रत्येकी तीन महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. हा निकाल आज (दि. ८) न्यायाधीश श्रीमती एस. जे. पाटील यांनी दिला.
या प्रकरणातील आरोपी लवू तुकाराम निकम (वय ३०) व मंगल लवू निकम (वय २६, दोघे रा. मुणगे, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) यांनी त्यांच्या सहा महिन्यांच्या मुलीला औषधोपचारासाठी जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे दाखल केले होते. उपचार सुरू असताना २१ डिसेंबर २०२१ रोजी पहाटे सुमारे ५.४५ वाजण्याच्या सुमारास त्यांनी कोणालाही न सांगता बाळाला रुग्णालयात सोडून पलायन केले. बाळाचा परित्याग करण्याच्या उद्देशाने हे कृत्य केल्याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून १५ फेब्रुवारी २०२२ रोजी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३१७ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत देवरे आणि पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र दळवी यांनी केला.
सदर खटल्यात सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता गुरुदास माजगावकर आणि सरकारी अभियोक्ता श्रीमती शिल्पा गोबाडे यांनी काम पाहिले. सरकारी पक्षाने नऊ साक्षीदार तपासले. विशेष सरकारी अभियोक्ता माजगावकर यांनी केलेल्या प्रभावी युक्तिवादानंतर न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोषी ठरवत भादंवि कलम ३१७, ३४ अंतर्गत प्रत्येकी तीन महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.खटल्याच्या सुनावणीदरम्यान पैरवी अंमलदार महिला पोलीस शिपाई शिंदे (बकल क्रमांक १२५४) यांनी सरकारी पक्षाला सहकार्य केले.









