पाडलोसमध्ये देवाच्या दिव्याच्या उजेडात विद्यार्थ्यांचा अभ्यास

रॉकेलही बंद, वीजही गायब; “आम्ही अभ्यास करायचा तरी कसा?” विद्यार्थ्यांचा संतप्त सवाल

बांदा (प्रतिनिधी) : पाडलोस गावात गेल्या चार दिवसांपासून वीज पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाल्याने ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांचे जनजीवन अंधारात गेले आहे. सर्वाधिक फटका शालेय विद्यार्थ्यांना बसत असून, देवासमोर लावल्या जाणाऱ्या छोट्या दिव्याच्या उजेडात अभ्यास करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. डिजिटल शिक्षण, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या घोषणा करणाऱ्या सरकारसमोर ही परिस्थिती गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे.

शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी घरी पोहोचायला सायंकाळचे सहा वाजतात. त्यानंतर अंधार पडतो; मात्र गावात वीज नसल्याने अभ्यास करणे अशक्य बनते. सरकारने काही वर्षांपूर्वी रॉकेलचा पुरवठा बंद केला. आता वीजही चार-चार दिवस उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी नेमका कोणता पर्याय वापरायचा, असा संतप्त सवाल पालक आणि विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी, गृहपाठ पूर्ण करणारी लहान मुले आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे युवक यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. मोबाईल चार्ज होत नसल्याने ऑनलाइन अभ्यास, शैक्षणिक माहिती आणि शिक्षकांशी संपर्कही तुटत आहे. वारंवार होणाऱ्या वीज खंडितामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

अंधाराविरुद्धचा संघर्ष तीव्र
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी संबंधित हा अत्यंत गंभीर प्रश्न असून, संबंधित यंत्रणा आणि सरकारने याची तातडीने दखल घेऊन पाडलोससह परिसरातील वीज पुरवठा त्वरित सुरळीत करावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. अन्यथा विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी सुरू असलेला हा अंधाराविरुद्धचा संघर्ष तीव्र करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे

error: Content is protected !!