ग्रामपंचायत सदस्यांच्या स्वाक्षरीने तहसीलदारांकडे प्रस्ताव; विशेष सभा बोलावण्याची मागणी
कणकवली (प्रतिनिधी) : पिसेकामते ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच प्राजक्ता नितीन मुद्राळे यांच्या विरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव सादर केला आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील तरतुदीनुसार ग्रामपंचायत सदस्यांच्या स्वाक्षरीने हा प्रस्ताव कणकवली तहसीलदारांकडे सादर करण्यात आला असून, सरपंचांविरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यासाठी विशेष सभा बोलावण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
६ ऑक्टोबर रोजी सादर करण्यात आलेल्या या निवेदनात सरपंचांचा कारभार समाधानकारक नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीचे कामकाज करताना विकासकामे व ग्रामपंचायत सदस्यांशी समन्वय न ठेवता मनमानी कारभार केला जात असल्याचे सदस्यांनी निवेदनात नमूद केले आहे. तसेच सरपंच प्राजक्ता नितीन मुंद्राळे यांनी वॉटर फिल्टर कमी किमतीत खरेदी करून अधिक किमतीत खरेदी केल्याची खोटी बिले जोडून भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे. ग्रामस्थांच्या विविध कामांसाठी ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध नसलेल्या साहित्याचीही खरेदी करण्यात येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांना विश्वासात न घेता जी.एम पोर्टलवरून ग्रामपंचायत साहित्याची मनमानी पद्धतीने खरेदी केली जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे सरपंचांविरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यासाठी विशेष सभा बोलवावी, अशी मागणी सदस्यांनी तहसीलदारांकडे केली आहे.
त्यामुळे पुढील प्रशासकीय कार्यवाहीकडे पिसेकामते ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.












