शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, युवासेना सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख सुशांत नाईक, शिवसेना देवगड तालुका प्रमुख गणेश गांवकर आणि युवक काँग्रेस सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर यांची आंदोलनस्थळी उपस्थिती
मुंबई (प्रतिनिधी) : शिक्षणाच्या हक्कासाठी मुंबईतील आझाद मैदान येथे बेमुदत धरणे आंदोलनाला आजपासून सुरुवात झाली आहे. या आंदोलनाला शिवसेना सचिव तथा माजी खासदार विनायक राऊत, युवासेना सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख तथा कणकवली उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, शिवसेना देवगड तालुका प्रमुख गणेश गांवकर तसेच युवक काँग्रेस सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला.
शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत अधिकार असून, कमी पटसंख्या किंवा इतर कोणतेही कारण देऊन गावातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊ नये, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. गाव, वाडी व वस्त्यांमधील शाळा कायम ठेवाव्यात, एका शाळेत एकच विद्यार्थी असला तरी त्या ठिकाणी शाळा सुरू ठेवावी आणि प्रत्येक वर्गासाठी व विषयासाठी स्वतंत्र शिक्षक उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
गुणवत्तापूर्ण शिक्षणावर परिणाम करणारे शासन निर्णय मागे घेऊन शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम करावी, शाळा व महाविद्यालयांमधील रिक्त शिक्षक पदे भरावीत, तसेच केजी ते पीजीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना मोफत व गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून द्यावे, अशा विविध मागण्या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येत आहेत.
शिक्षणाचे खाजगीकरण व बाजारीकरण रोखून सर्वसामान्य, ग्रामीण, कष्टकरी आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना समान शिक्षणाची संधी मिळावी, यासाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
यावेळी शिवसेना सचिव तथा माजी खासदार विनायक राऊत, युवासेना सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख तथा कणकवली उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, शिवसेना देवगड तालुका प्रमुख गणेश गांवकर आणि युवक काँग्रेस सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर यांनी शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांना आपला ठाम पाठिंबा व्यक्त केला. शिक्षण व्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी शासनाने या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी बाळू मेस्त्री उपस्थित होते. तसेच संपत देसाई, संजय वेतुरेकर आणि सिद्धार्थ जगदेव हे मोर्चाचे नेतृत्व करत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली मोर्चात मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले आहेत.












