शिक्षणमंत्री दादा भुसे यांची घेतली भेट
कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाड्यांमधील अपुऱ्या भौतिक सुविधा, जीर्ण इमारती, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि अन्य पायाभूत सुविधांच्या प्रश्नांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, यासाठी कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे मंत्री दादा भुसे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विविध मागण्यांचे सविस्तर निवेदन देत, कणकवलीतील जि.प. शाळांच्या विकासासाठी विशेष निधी मंजूर करण्याची आग्रही मागणी केली.
प्रमुख मागण्या व मुद्दे:अपुऱ्या भौतिक सुविधा: शहरातील काही जि.प. शाळांमध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, सुरक्षित इमारती, दारे-खिडक्या तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित सुविधा अत्यंत अपुऱ्या असून, विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे.
शाळा क्र. ४ बंद असल्याचा मुद्दा ऐरणीवर: शहरातील ऐतिहासिक आणि नावाजलेली कणकवली शाळा क्रमांक ४ बंद पडल्यामुळे हर्णे आळी, तेली आळी, बिजली नगर, सोनगेवाडी, नाथपै नगर आणि जळकेवाडी परिसरातील गरीब व सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामागील प्रशासकीय कारणांची सखोल चौकशी व्हावी.विशेष निधीची मागणी: जिल्हा परिषद शाळांमध्ये आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी विशेष अनुदानातून तातडीने निधी मंजूर करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत.
जमिनी नगरपंचायतीकडे हस्तांतरित करण्याची मागणी: शाळांचे शैक्षणिक नियंत्रण, शिक्षक व कर्मचाऱ्यांची व्यवस्था जिल्हा परिषदेकडेच कायम ठेवावी; मात्र शाळांच्या जमिनी व इमारतींचे मालकी हक्क नगरपंचायतीकडे हस्तांतरित करावेत, जेणेकरून नगरपंचायतीला स्वतःच्या विकास निधीतून शाळांच्या विकासाची कामे करणे सुलभ होईल.
विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न
विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबत सुरक्षित, स्वच्छ आणि आधुनिक शैक्षणिक वातावरण मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. त्यामुळे शासनाने या निवेदनाची तातडीने दखल घेऊन तांत्रिक अडचणी दूर कराव्यात आणि सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी व्यक्त केली आहे.












