खारेपाटण हायस्कूल मध्ये मधुमेहाबाबत जनजागृती

ब्ल्यू सर्कल डायबेटिस मिशनच्या वतीने मार्गदर्शनपर व्याख्यान

खारेपाटण (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांमध्ये मधुमेहाबाबत जागरूकता निर्माण व्हावी, त्याचे प्रकार, जोखीम घटक तसेच निरोगी जीवनशैलीचे महत्त्व समजावे, या उद्देशाने मुंबई येथील Blue Circle Diabetes Mission या संस्थेच्या माध्यमातून खारेपाटण हायस्कूल येथील इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मधुमेह जनजागृतीपर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. Blue Circle Diabetes Foundation ही भारतातील मधुमेहग्रस्त व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी काम करणारी रुग्ण-नेतृत्वाखालील (patient -led) ना-नफा संस्था आहे. तिचे मुख्य उद्दिष्ट मधुमेहाबाबत जनजागृती करणे, माहिती व मार्गदर्शन देणे, रुग्णांना एकमेकांचा आधार मिळवून देणे आणि त्यांच्या हक्कांसाठी advocacy करणे हे आहे.

या कार्यक्रमात संस्थेचे स्वयंसेवक श्री.अय्यर व श्री.ढाके यांनी विद्यार्थ्यांना मधुमेह या विषयावर मौलिक व सखोल मार्गदर्शन केले. मधुमेहाचे विविध प्रकार, मधुमेह होण्यामागील कारणे व जोखीम घटक, आरोग्यदायी आहार, नियमित व्यायाम आणि दैनंदिन जीवनशैलीतील योग्य सवयी याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक व आरोग्यदायी जीवनशैलीचा अंगीकार करून निरोगी जीवन जगावे, असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला.

मधुमेहा संदर्भातील गैरसमज दूर करून योग्य माहिती समाजापर्यंत पोहोचविणे, तसेच मधुमेहग्रस्त व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांना मार्गदर्शन व मानसिक आधार देणे, या संस्थेच्या कार्याची माहितीही विद्यार्थ्यांना देण्यात आली. जनजागृती, शिक्षण आणि निरोगी जीवनशैलीचा प्रसार यामुळे मधुमेहाच्या वाढत्या समस्येला आळा घालण्यास मदत होऊ शकते, असा संदेश यावेळी देण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाचे प्राचार्य संजय सानप व पर्यवेक्षक संतोष राऊत सर यांनी पुष्पगुच्छ देऊन उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांनीही व्याख्यानास उत्स्फूर्त प्रतिसाद देत मधुमेह आणि आरोग्यविषयक माहिती जाणून घेतली.विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक जाणीवा समृद्ध करणारा आणि निरोगी जीवन शैलीची प्रेरणा देणारा हा जनजागृतीपर कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

error: Content is protected !!