चौघांना अटक; न्यायालयाकडून सहा दिवसांची पोलीस कोठडी
वैभववाडी (प्रतिनिधी) : विवाहित महिलेला धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी खांबाळे येथील चार तरुणांविरुद्ध वैभववाडी पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. विक्रांत रणजित पवार (२२), अक्षय कमलाकर चव्हाण (२८), परेश पंढरीनाथ साईल (२५) आणि तुषार सुरेश कर्पे (२४) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. चौघांनाही अटक करण्यात आली असून, ओरोस येथील जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा पती नोकरीनिमित्त बाहेर असतो. ती आजारी सासूसोबत राहत असून, उदरनिर्वाहासाठी शेती व शेतमजुरी करते. आरोपी विक्रांत पवार याच्याकडे शेतीची नांगरणी करण्यासाठी पॉवर ट्रिलर असल्याने त्याची पीडित महिलेशी ओळख झाली होती.त्यानंतर दोघेही इन्स्टाग्रामवरून एकमेकांच्या संपर्कात होते.
मार्च २०२६च्या पहिल्या आठवड्यात विक्रांत पवार रात्री पीडित महिलेच्या घरी गेला. त्याने आणलेले शीतपेय पिण्याचा आग्रह केला. ते प्यायल्यानंतर महिलेला गरगरल्यासारखे होऊन ती बेशुद्ध झाली. या अवस्थेचा गैरफायदा घेत त्याने तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. शुद्धीवर आल्यानंतर हा प्रकार तिच्या लक्षात आला. त्यानंतर विक्रांतने या घटनेचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने महिलेने याबाबत कोणाला काही सांगितले नाही.
दोन दिवसांनंतर विक्रांतने पुन्हा फोन करून शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याने तिच्यावर पुन्हा अत्याचार केला. तर एप्रिल महिन्यात तो आपल्या दोन मित्रांसह पीडित महिलेच्या घरी आला. पुन्हा धमकी देत तिच्यावर आळीपाळीने तिघांनी अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर काही दिवसाने एप्रिलमधे पुन्हा विक्रांत त्याने आणखी एका मित्राला घेऊन आला. त्यानेही आत्याचर केले.
या घटनेनंतर पीडित महिला भयभीत झाली होती. तिच्या वागण्यात झालेला बदल पतीच्या लक्षात आल्यानंतर त्याने तिला विश्वासात घेऊन विचारणा केली. त्यावेळी महिलेने पतीला आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पतीसोबत मंगळवारी सायंकाळी वैभववाडी पोलीस ठाण्यात येऊन तिने फिर्याद दिली.
फिर्याद दाखल होताच पोलिसांनी कारवाई करून चारपैकी तीन आरोपींना ताब्यात घेतले, तर चौथ्या आरोपीला बुधवारी सकाळी अटक केली. चौघांनाही ओरोस येथील जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा अधिक तपास वैभववाडी पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर करीत आहेत.












