जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी , कृषि अधिकारी यांनी स्वतः हाती फावडा, घमेल घेऊन काढला नाल्यातील गाळ

काळसे येथे जलसंधारणासाठी प्रशासन व ग्रामस्थांनी श्रमदान करून नाल्यातून गाळ काढून बांधले बंधारे

काळसेवासियांची वनराई बंधारे बांधून दिली नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

चौके (अमाेल गाेसावी) : मालवण तालुक्यातील माळकेवाडी, बामणदेव परिसरात तालुका कृषि अधिकारी कार्यालय मालवण, महसूल प्रशासन, पंचायत समिती मालवण, तहसीलदार कार्यालय मालवण आणि ग्रामपंचायत काळसे यांच्या वतीने गुरुवार दिनांक 8 ऑक्टोबर रोजी लोकसहभागाने श्रमदानातून नाल्यातील गाळ काढणे आणि जलसंधारण बंधारे बांधणे हा उपक्रम राबवण्यात आला.

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, प्रांताधिकारी श्रीमती ऐश्वर्या काळूसे, मालवण तहसीलदार गणेश लव्हे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री नाईक नवरे , गटविकास अधिकारी परागिनी पाटील, यांच्या प्रमुख उपस्थितीत काळसे येथे जलस्रोत जपण्यासाठी श्रमदान करून नाल्यातील गाळ काढण्यात आला व बंधारा बांधून पाणी अडवण्यात आले यावेळी वरील सर्व मान्यवर अधिकारी यांनी स्वतः नाल्यात उतरून श्रमदान केले व त्यांच्या सोबत काळसे सरपंच विशाखा काळसेकर, उपसरपंच अनिल सरमळकर, सर्व ग्रामपंचायत सदस्य, धामापूर सरपंच सौ. मानसी परब, नायब तहसीलदार प्रिया हर्णे, तालुका कृषि अधिकारी अमोल करंदीकर, उप कृषि अधिकारी धनंजय गावडे, सीताराम परब, कृषि सहाय्यक स्नेहा खोत. ग्रामसेविका अर्पिता शेलटकर, मंडळ अधिकारी सुदर्शन अलकुटे, तलाठी समीरा सावंत, सहाय्यक कृषि अधिकारी किशोर कदम, माजी सभापती तथा भगवती देवी पाणीवाटप संस्था अध्यक्ष राजेंद्र परब, काळसे धामापूर शिक्षण प्रसारक मंडळ उपाध्यक्ष योगेश राऊळ, प्रगत शेतकरी गटाचे अध्यक्ष मनोज मालवणकर, श्याम मालवणकर व सर्व शेतकरी सदस्य, काळसे हायस्कुल मुख्याध्यापक अविनाश परब, आरोग्य विभागाच्या समुदाय आरोग्य अधिकारी दिव्या शेवडे, आरोग्य सेविका गौरी कसालकर, आरोग्य सेवक यशवंत गावडे ग्रामस्थ सतीश गोसावी, संजय गोसावी, जितेंद्र गोसावी, सुनिल मालवणकर, रमेश मयेकर, आनंद राणे, विजय गोसावी, तसेच परिसरातील सर्व आशा स्वयंसेविका, कोतवाल, काळसे हायस्कूलचे विद्यार्थी विद्यार्थिनी, शेतकरी व ग्रामस्थ या सर्वांनी मिळून श्रमदान केले व नाल्यातील गाळ काढून नाल्यातील पाणी पातळी वाढवण्या साठी बंधाराही बांधला.

यावेळी प्रतिक्रिया देताना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सांगितले कीं सिंधुदुर्गात मागील 30 ते 40 वर्षातील सर्वात कमी पाऊस यावर्षी झाला आहे. त्यामुळे खालावलेली पाणीपातळी ही चिंताजनक बाब आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नितेशजी राणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन, राजकीय प्रतिनिधी तसेच लोक सहभागातून सध्याच्या घडीला आपल्या हातात असलेले छोटेमोठे पाण्याचे प्रवाह आहेत ते अडवणे जिरवणे आणि भुगर्भातील पाण्याची पातळी वाढवणे यावर भर देत आहे. याकामी लोकसहभागही चांगला मिळत आहे.

सन २०१५ पासून नाम फाउंडेशनच्या माध्यमातून जलसंधारण आणि शेतकऱ्यांसाठी काम करणारे दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांचे आकस्मिक निधन झाले त्यांना या आज बांधलेल्या जलसंधारण बंधाऱ्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने काळसेवासियांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी काळसे येथे खारबंधारा बांधून मिळावा यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.

” धामापूर तलाव व मोठया जल स्रोतांसाठी विशेष टास्क फोर्स ची निर्मिती “
काळसे धामापूर गावातील सर्वात मोठा जलस्रोत असलेल्या धामापूर तलावाच्या गाळ काढणे आणि व संधारण संदर्भात विचालेल्या प्रश्नाला उत्तर देताना जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, धामापूर तलावातील गाळ काढणे हा आमच्यासाठी महत्वाचा आणि मोठा प्रश्न आहे. या कामासाठी जास्त निधीची गरज आहे. या संदर्भातील नियोजनासाठी शनिवारी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जलसंधारण विभाग, जल संपदा विभाग आणि पाणीपुरवठा विभाग या तीनही यंत्रणाची बैठक झाली असून संपूर्ण जिल्ह्यातील धामापूर तलाव सारखे मोठे व इतर छोटे जलाशयातील पाणी वाचवण्यासाठी त्यासाठी आवश्यक दुरुस्त्या करणे, गाळ काढणे, बंधारे बांधणे, फळ्या टाकणे, विंधन विहिरींची दुरुस्ती करणे ही कामांची पूर्तता करण्यासाठी तीनही विभागाच्या निवडक अभियंत्यांच्या टास्क फोर्स ची निर्मिती करण्यात आली आहे.

छोटे जलस्रोत बळकट करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थाना 15 वा वित्त आयोग, ग्रामपंचायत स्वनिधी यामधून निधी वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. असे सांगून लोकांनीही पाण्याचा अपव्यय टाळून जलस्रोत वाचवावेत असे आवाहन जिल्ह्याधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी यावेळी केले.

error: Content is protected !!