पुरस्कारापेक्षा प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आरोग्य सुविधा मिळणे महत्त्वाचे : प्रमोद कामत
ओरोस (प्रतिनिधी) : ‘माझे गाव,आरोग्यसंपन्न गाव’ अभियानात सिंधुदुर्ग जिल्ह्याला राज्यात प्रथम क्रमांक मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे. केवळ पुरस्कार मिळविणे हा उद्देश न ठेवता प्रत्येक नागरिकापर्यंत दर्जेदार आरोग्य सुविधा पोहोचल्या पाहिजेत. विशेषतः एकल महिला, निराधार वृद्ध, वृद्ध दांपत्ये आणि बालकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. या अभियानाला लोकसहभागातून चळवळीचे स्वरूप द्यावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी केले.
जिल्हा नियोजन समितीच्या सिंधू नीती सभागृहात आज ‘माझे गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या अभियानाची जिल्हास्तरीय कार्यशाळा झाली. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तुकाराम ऊर्फ दादा साईल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अपूर्वा बासुर, शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर, महिला व बालकल्याण सभापती अनुराधा नारकर, समाजकल्याण सभापती रुहिता तांबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा परिषद सदस्या दीपलक्ष्मी पडते, महिला व बालकल्याण अधिकारी प्रतीक उगारे, निलेश मठकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या. दीपप्रज्वलन आणि ‘माझे गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या विशेष प्रार्थनेने कार्यशाळेची सुरुवात झाली.
यावेळी पुढे बोलताना कामत यांनी, ‘‘प्रत्येक काम शंभर टक्के समर्पित भावनेने केले पाहिजे. गावातील एकही बालक कुपोषित राहू नये. प्रत्येक शाळेत स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध झाले पाहिजे. घराबाहेर पडू न शकणाऱ्या वृद्धांच्या घरी जाऊन त्यांच्या आरोग्याची चौकशी झाली पाहिजे. यासाठी आरोग्य यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करावे.’’, असे आवाहन केले.












