कोकण विभागातील ३९ महसूल कर्मचाऱ्यांना पदोन्नती; नायब तहसीलदार संवर्गात पदोन्नती

मुंबई (प्रतिनिधी) : कोकण विभागातील सहायक महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी संवर्गातील ३९ कर्मचाऱ्यांना नायब तहसीलदार (गट-ब, राजपत्रित) संवर्गात पदोन्नती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये १३ कर्मचाऱ्यांना नियमित पदोन्नती, १३ कर्मचाऱ्यांना तदर्थ पदोन्नती, तर यापूर्वी तदर्थ पदोन्नती मिळालेल्या १३ कर्मचाऱ्यांची पदोन्नती नियमित करण्यात आली आहे.

सन २०२५-२६ च्या निवडसूचीतून ८ सहायक महसूल अधिकारी आणि ५ मंडळ अधिकारी, अशा एकूण १३ कर्मचाऱ्यांना नायब तहसीलदार संवर्गात नियमित पदोन्नती देण्यात आली आहे. तसेच ९ सहायक महसूल अधिकारी आणि ४ मंडळ अधिकारी, अशा आणखी १३ कर्मचाऱ्यांना तदर्थ पदोन्नती देण्यात आली आहे.

याशिवाय सन २०२३-२४ च्या निवडसूचीतून यापूर्वी नायब तहसीलदार संवर्गात तदर्थ पदोन्नती मिळालेल्या १० सहायक महसूल अधिकारी आणि ३ मंडळ अधिकारी, अशा एकूण १३ कर्मचाऱ्यांची पदोन्नती सन २०२५-२६ या निवडसूची वर्षातील उपलब्ध पदांवर नियमित करण्यात आली आहे. ही प्रक्रिया विभागीय आयुक्त, कोकण यांच्या अध्यक्षतेखालील विभागीय पदोन्नती समितीच्या बैठकीतील शिफारशीनुसार करण्यात आली आहे. पदोन्नती देताना १ जानेवारी २०२५ रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची, वरिष्ठ कर्मचाऱ्यांना डावलले नसल्याची खात्री तसेच संबंधित न्यायालयीन प्रकरणांच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहण्यासह विविध अटी लागू करण्यात आल्या आहेत.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,
“कोकण विभागातील महसूल कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण झाल्याने संबंधित कर्मचाऱ्यांना सेवेत पुढील संधी मिळाली आहे. पदोन्नतीची प्रक्रिया नियमानुसार पूर्ण करून पात्र कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या पदोन्नतीमुळे महसूल विभागाचे कामकाज अधिक सक्षम होऊन नागरिकांना सेवा देताना त्याचा निश्चितच फायदा होईल.”

error: Content is protected !!