कणकवली (प्रतिनिधी) : ‘स्मृती त्यांच्या, सेवा आपल्या हातून आणि समाधान एखाद्याच्या चेहऱ्यावर!’ या भावनेतून कणकवली नगरपंचायत, कणकवली,महिला बालकल्याण विभाग DJAY-S व कनकसिंधु शहर स्तर संघ, कणकवली यांच्या वतीने सेवा संकल्प अभियान व पितृ पंधरवडा यांचे औचित्य साधून ‘एक हात मदतीचा… आपल्या प्रियजनांच्या स्मृतींसोबत’ हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
आपल्या प्रियजनांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून गरजू व्यक्तींना आवश्यक वस्तू व साहित्याच्या माध्यमातून मदतीचा हात देण्याचे आवाहन बचत गट व नागरिकांना करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत साबण, टूथपेस्ट व ब्रश, खाद्यतेल, तांदूळ, डाळी व इतर धान्य, कपडे तसेच दैनंदिन वापरातील आवश्यक वस्तू स्वीकारण्यात आल्या.या उपक्रमात शहरातील 150 नागरिकांनी सहभाग होत मदतीचा हात दिला.
जमा करण्यात आलेले वस्तू व साहित्य कणकवली नगरपंचायतचे नगराध्यक्ष संदेश पारकर, मुख्याधिकारी गौरी पाटील, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, नगरसेवक संकेत नाईक याच्या उपस्थित जिल्हातील वृद्धासाठी काम करणारे जीवन संजीवन सेवा ट्रस्ट आनंदश्रय वृद्धाश्रम,पणदूर व दिविजा वृद्धाश्रम,असलदे, तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज मतिमंद निवासी विद्यालय,करंजे ता.कणकवली या तीन संस्थाना जमा झालेल्या वस्तू व साहित्य देण्यात आले. ‘आपली छोटीशी मदत एखाद्यासाठी मोठा आधार ठरू शकते!’ या संदेशातून समाजातील गरजू घटकांना मदत करण्याची आणि आपल्या प्रियजनांच्या स्मृतींना माणुसकीच्या सेवेतून आदरांजली देण्याची प्रेरणा या उपक्रमातून देण्यात आली.












