दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी ‘चारा बँका’ उभारणार

चारा बियाण्यासाठी ५० लाखांची तरतूद; ७५ हजार किलो बियाण्यांचे वाटप होणार

ओरोस (प्रतिनिधी) : संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पशुधनासाठी चाऱ्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी आतापासूनच गावोगावी ‘चारा बँका’ उभारण्यावर भर देण्यात येणार आहे. जिल्हा नियोजन समितीमधून चारा बियाण्यासाठी ५० लाख रुपये मंजूर झाले असून, त्यातून ७५ हजार किलो चारा बियाण्यांचे वाटप केले जाणार आहे. मात्र, केवळ नवीन चारा उत्पादनावर अवलंबून न राहता सध्या उपलब्ध असलेला चारा कापून त्याची साठवणूक करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन व दुग्ध विकास समिती सभापती तुकाराम उर्फ दादा साईल यांनी आज येथे केले.

जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन व दुग्धविकास समितीची सभा सभापती तुकाराम ऊर्फ दादा साईल यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाली. यावेळी पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.रवींद्र दळवी, जिल्हा पशुधन अधिकारी डॉ. सुधाकर ठाकूर, समिती सदस्य संतोष पारकर, सत्यवान सडवेलकर, शीतल दळवी, देवगड पंचायत समिती सभापती गणेश राणे, दोडामार्ग पंचायत समिती सभापती श्वेता धरणे आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळजन्य परिस्थिती, पशुधनासाठी चारा उपलब्धता, पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे, विविध योजनांना मिळालेला प्रतिसाद, दुधाळ जनावरांसाठी अर्थसाहाय्य आणि मोकाट जनावरांचा प्रश्न अशा विविध विषयांवर सभेत चर्चा झाली. सभेच्या प्रारंभी जिल्हा परिषदेचे माजी सभापती एस. टी. सावंत आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

साईल म्हणाले, ‘‘जिल्ह्यात सध्या उपलब्ध असलेला हिरवा चारा वेळेत कापून त्याची साठवणूक करणे आवश्यक आहे. अन्यथा काही दिवसांनी हा चारा नष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वैयक्तिक तसेच गावपातळीवर चारा बँका तयार कराव्यात. यासाठी गावोगावी व्यापक प्रचार आणि जनजागृती झाली पाहिजे. जिल्हा परिषद सदस्यांनीही पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना चारा साठवणुकीसाठी प्रोत्साहित करावे.’’, असे आवाहन केले

error: Content is protected !!