ओटभरणी समारंभात रुजवले संस्कारांचे बीज!

स्वाती-सिद्धेश आचरेकर यांचा अनोखा संस्कार सोहळा; मुलगा-मुलगी समानतेसह माणुसकी, समता अन् शिक्षणाचा संदेश

आचरा (प्रतिनिधी) : घरात येणाऱ्या नव्या पाहुण्याची चाहूल लागली की आनंदाला उधाण येते. नातेवाईकांची लगबग, आप्तेष्टांच्या शुभेच्छा, आईच्या चेहऱ्यावरचे समाधान आणि बाळाच्या आगमनाची उत्सुकता… या सगळ्या भावनांना एकत्र गुंफणारा ओटभरणी समारंभ आचरा येथे यावेळी एका वेगळ्याच विचाराने रंगला. ‘पेढा की बर्फी?’ या पारंपरिक मनोरंजक प्रथेला बाजूला सारत, त्याऐवजी ‘बाळाला कोणते संस्कार द्यायचे?’ हा विचार केंद्रस्थानी ठेवत स्वाती व सिद्धेश आचरेकर या दांपत्याने आपल्या ओटभरणी समारंभाला ‘संस्कार सोहळ्या’चे स्वरूप दिले.

स्वाती या पोलिस विभागात तर त्यांचे पती सिद्धेश आचरेकर हे पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. समाजाशी सातत्याने जोडलेले असलेल्या या दोघांच्याही मनात आपल्या कुटुंबातील या आनंदाच्या प्रसंगाला समाजाभिमुख आणि सकारात्मक विचारांची जोड देण्याची संकल्पना होती. त्यातूनच पारंपरिक ओटभरणीला आधुनिक आणि पुरोगामी विचारांची जोड देत ‘संस्कार सोहळा’ साकारण्यात आला. ‘नव्या जीवनाचे स्वागत… नव्या विचारांची सुरुवात’ या संकल्पनेतून झालेल्या या सोहळ्याला नातेवाईक, मित्रपरिवार आणि आप्तेष्टांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पहिल्याच प्रयत्नात साकारलेल्या या वेगळ्या संकल्पनेचे उपस्थितांनी मनापासून कौतुक केले. निवेदन प्राध्यापक नितीन जाधव यांनी केले.

पारंपरिक ओटभरणीचा आनंद, आपुलकी आणि कौटुंबिक वातावरण कायम ठेवत या सोहळ्यात प्रेम, माणुसकी, समता, शिक्षण, पर्यावरणप्रेम, सेवा, कृतज्ञता आणि सामाजिक भान या मूल्यांना विशेष स्थान देण्यात आले. त्यामुळे हा समारंभ केवळ एका कुटुंबाच्या आनंदाचा क्षण न राहता, पुढील पिढीला कोणता विचार आणि कोणता वारसा द्यायचा, याची जाणीव करून देणारा ठरला.

संस्काराला प्राधान्य
ओटभरणी समारंभ म्हटला की बाळ मुलगा की मुलगी, याचा अंदाज लावण्याची ‘पेढा की बर्फी?’ ही गंमतीदार प्रथा अनेक ठिकाणी पाहायला मिळते. मात्र, बाळाचे लिंग जाणून घेण्यापेक्षा त्याच्या व्यक्तिमत्त्वाची पायाभरणी करणारे संस्कार महत्त्वाचे, हा विचार आचरेकर दाम्पत्याने मांडला.
त्यामुळे यावेळी पेढा-बर्फीच्या अंदाजाऐवजी उपस्थित महिलांनी सामाजिक संस्कार देणारे फलक हातात घेऊन नव्या पाहुण्याला नवा संस्कार दिला. मुलगा की मुलगी याबाबत उत्सुकता ठेवण्यापेक्षा जन्माला येणाऱ्या प्रत्येक बाळाचे मनापासून स्वागत व्हावे, त्याला समानतेची शिकवण मिळावी आणि त्याच्या स्वप्नांना पंख मिळावेत, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला

आधुनिक विचारांची साथ
ओटभरणीतील पारंपरिक औक्षण, ओटी भरणे, आशीर्वाद यांचा आनंद घेत असतानाच त्याला आधुनिक आणि पुरोगामी विचारांची जोड देण्यात आली. त्यामुळे संस्कार सोहळ्यात परंपरेची ऊब आणि नव्या विचारांची साथ असा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. प्रेम, समता, माणुसकी, शिक्षण आणि निसर्गाची जपणूक यांसारख्या मूल्यांचा वारसा पुढील पिढीला देण्याचा संकल्प यानिमित्ताने करण्यात आला. पारंपरिक ओटभरणीला सामाजिक विचारांची जोड देण्याच्या या प्रयत्नाचे उपस्थितांनी कौतुक केले.

error: Content is protected !!