सह्याद्री जीव रक्षक टीमचे ४० युवक शोधमोहिमेत; पोलीस व महसूल अधिकारी घटनास्थळी
वैभववाडी (प्रतिनिधी) : करुळ गावठण ब येथील शेतकरी सदानंद हरिश्चंद्र कदम (वय ६०) हे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी घडली. कामानिमित्त शेतात जात असताना नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे करुळ परिसरासह संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. सदानंद कदम हे आज सकाळी घरातून खत व कोयता घेऊन आपल्या शेतात जात होते. घरापासून काही अंतरावर नदीकाठाजवळ त्यांचा पाय घसरला. नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने ते पुराच्या प्रवाहात वाहून गेले. घटनेची माहिती मिळताच वैभववाडी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तसेच महसूल विभागाचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले असून, नदीपात्रात युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. करुळ गावातील सह्याद्री जीव रक्षक टीमचे सुमारे ४० युवक सदानंद कदम यांचा शोध घेण्यासाठी नदीपात्रात उतरले आहेत. नदीतील पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने शोधकार्यात अडथळे येत असले तरी त्यांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.













