मुंबईच्या अभ्यासकांची सिंधुदुर्गात दोन दिवसांची अभ्यासपूर्ण भटकंती

लेणी संवाद प्रमुख प्रफुल्ल पुरळकर लेणी अभ्यासक सारीश डोळस यांचा उपक्रम

खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील प्राचीन लेणी,ऐतिहासिक वास्तू आणि सांस्कृतिक वारशाचा अभ्यास करून त्याचा प्रचार-प्रसार करणारे मुंबईतील ‘लेणी संवाद’चे प्रमुख प्रफुल्ल पुरळकर आणि ‘एकजूट लेणी अभ्यास प्रचार प्रसार समूह, महाराष्ट्र राज्य’चे प्रमुख सारीश डोळस यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन दिवसांची अभ्यासपूर्ण भटकंती केली. या दौऱ्यात त्यांनी वेंगुर्ला, मालवण, कुडाळ आणि सावंतवाडी तालुक्यांतील विविध ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक वारसास्थळांना प्रत्यक्ष भेट देऊन त्यांचा अभ्यास केला. या दोन दिवसांत अनेक मंदिरे, चर्च, प्राचीन बंदरे, डच वखार, जुन्या शाळा, कोरजाई येथील लेणी-मंदिर, निवती व भरतगड किल्ले तसेच मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आदी महत्त्वपूर्ण स्थळांना त्यांनी भेटी दिल्या.

सिंधुदुर्गच्या बौद्ध आणि सामाजिक वारशाचाही या भटकंतीत विशेष अभ्यास करण्यात आला. म्हापण येथील नालंदा बुद्ध विहार, वेरळ येथील प्रज्ञा बुद्ध विहार आणि निरवडे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक यांना भेट देऊन स्थानिक इतिहास, सामाजिक-सांस्कृतिक परंपरा आणि वारसा जतनाच्या विविध पैलूंची माहिती त्यांनी जाणून घेतली. पुरळकर आणि डोळस हे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील लेणी, किल्ले, प्राचीन वास्तू आणि वारसा स्थळांना नियमित भेटी देऊन त्यांचा अभ्यास करीत आहेत. प्रत्यक्ष स्थळभेटी, उपलब्ध ऐतिहासिक साधने आणि स्थानिकांकडून मिळणारी माहिती यांच्या आधारे या वारशाची ओळख सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम ते सातत्याने करत आहेत.

सिंधुदुर्गातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांबरोबरच दुर्लक्षित आणि अपरिचित वारसास्थळांचा शोध घेणे, त्यांचे ऐतिहासिक महत्त्व समजून घेणे आणि या स्थळांच्या अभ्यासाला चालना देणे, हा या दोन दिवसीय दौऱ्याचा प्रमुख उद्देश होता. त्यामुळे ही भटकंती केवळ पर्यटनापुरती मर्यादित न राहता अभ्यास, निरीक्षण आणि वारसा संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरली. या अभ्यास दौऱ्यासाठी कणकवलीचे डॉ. चंद्रकांत पुरळकर आणि म्हापणचे उपासक चंद्रकांत म्हापणकर यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांच्या स्थानिक मार्गदर्शनामुळे विविध वारसास्थळांची माहिती जाणून घेणे आणि त्यांचा अभ्यास करणे अधिक सुलभ झाले.

या अभ्यासपूर्ण दौऱ्यानंतर सिंधुदुर्गच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाबद्दल अधिक व्यापक अभ्यास करण्याचा निर्धार या दोन्ही अभ्यासकांनी व्यक्त केला. फेब्रुवारी २०२७ मध्ये मालवण परिसरातील कातळशिल्पांचा सखोल अभ्यास करण्यासाठी पुन्हा सिंधुदुर्गात येणार असल्याचे त्यांनी स्थानिकांना सांगितले. सिंधुदुर्गातील पर्यटनाच्या पलीकडे जाऊन येथील प्राचीन इतिहास, धार्मिक परंपरा, सागरी व्यापार, वास्तुशैली, बौद्ध वारसा आणि लोकस्मृती यांचा अभ्यास करण्याचा हा उपक्रम जिल्ह्याच्या समृद्ध वारशाकडे पाहण्याची एक नवी आणि अभ्यासपूर्ण दृष्टी देणारा ठरला आहे.

error: Content is protected !!