मोती तलावात उडी घेतलेल्या “त्या” दोघांचा मृत्यू

सावंतवाडी (प्रतिनिधी) : येथील प्रसिद्ध मोती तलावाच्या काठावरील बापूसाहेब महाराज पुतळ्याजवळील बागेत आज, शनिवारी दुपारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत १६ वर्षीय शालेय विद्यार्थिनी आणि तिला वाचवण्यासाठी गेलेल्या २४ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. निशा भिकाजी गोसावी (वय १६, रा. कारिवडे) आणि रोहन विजय गोसावी (वय २४, रा. नाधवडे-सरदारवाडी, वैभववाडी) अशी मृतांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कारिवडे येथील शाळेत दहावीत शिकणारी निशा गोसावी ही शनिवारी सकाळची शाळा आटपून तिच्या चुलत बहिणीसोबत सावंतवाडीत आली होती. मुंबई सांताक्रुझ येथून आलेला तिचा नातेवाईक तरुण रोहन गोसावी हा त्यांना भेटण्यासाठी आला होता. सर्वजण मोती तलाव काठावरील बागेत बसले होते आणि छायाचित्रे काढत होते.

यादरम्यान, तलावाच्या कठड्यावर बसलेल्या निशाने अचानक तलावात उडी घेतली. हा प्रकार पाहून तिच्या चुलत बहिणीने रोहनला कल्पना दिली. रोहनने क्षणाचाही विलंब न लावता तिला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पाण्यात तरंगणाऱ्या रोहनला तातडीने बाहेर काढण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. तर मुलगी पाण्यात खोल गेल्यामुळे तिचा शोध घेण्यात अडथळा येत होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम आणि पोलीस हर्षद हिंगे पथकासह घटनास्थळी दाखल झाले.पोलीस प्रशासनाने बाबल अल्मेडा आणि त्यांच्या टीमला पाचारण केले. सायंकाळी ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने मुलीचा मृतदेह शोधून बाहेर काढण्यात आला. दोन्ही मृतदेह विच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
मुलीने तलावात उडी का घेतली, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक तपासाच्या आधारे प्रेमप्रकरणातून हा प्रकार घडला असावा असा संशय पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी व्यक्त केला असून, सावंतवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे सावंतवाडी शहरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिस ठाण्यात खुशी गोसावी हीने पोलीसांना सविस्तर दिली. दरम्यान फोटो पाण्यात उडी घेणाऱ्या निशा गोसावी हीचा कठड्यावर बसलेला फोटो शेवटचा ठरला. या घटनेमुळे सर्वांनी शोक व्यक्त केला.

error: Content is protected !!