खारेपाटण येथे तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयांची स्वतंत्र इमारत होणार

खारेपाटण तालुका निर्मिती कृती समितीच्या मागणीला यश

जमीन मोजणी प्रक्रियेला करण्यात आली सुरवात

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण येथे तलाठी सजा कार्यालय व मंडल अधिकारी कार्यालय यांना स्वतंत्र इमारत नसल्याने कर्मचारी वर्गा बरोबरच नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत होता. मात्र खारेपाटण तालुका निर्मिती कृती समितीच्या वतीने याचा पाठपुरावा करताच महाराष्ट्र शासन महसुल व वन विभागाच्या वतीने लवकरच येथे नवीन स्वतंत्र तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालय उभारण्यात येणार असल्याचे समजते. दरम्यान याकरिता अत्यावश्यक असलेल्या जमिनीची मोजणी प्रक्रिया देखील सुरू करण्यात आल्याने खारेपाटण तालुका निर्मिती कृती समितीच्या या मागणीला यश आल्यामुळे ग्रामस्थानी आभार व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्याचे महसूल व वन मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे हे नुकतेच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता तालुका समितीचे अध्यक्ष रमाकांत राऊत उपाध्यक्ष मंगेश गुरव, सचिव – संतोष पाटणकर यांनी त्यांची कणकवली येथे जनता दरबारी भेट घेऊन खारेपाटण येथे नवीन तलाठी व सर्कल कार्यालयाच्या इमारत मंजूर करण्याबाबत लेखी निवेदन दिले होते. या निवेदनाची महसूल विभागाच्या वतीने तातडीने दखल घेत खारेपाटण येथे तलाठी व मंडल अधिकारी कार्यालयासाठी अत्यावश्यक असणाऱ्या जागेची मोजणी प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान खारेपाटण येथे या जमीन मोजणी प्रक्रिये वेळी खारेपाटण मंडळ अधिकारी सरिता बावलेकर, ग्राम महसूल अधिकारी प्रवीण लुडबे, कोतवाल प्रथमेश गुरसाळे, पोलीस पाटील अनिकेत जामसंडेकर यांसह मोजणी अधिकारी उपस्थित होते. तलाठी सजा कार्यालय व मंडल अधिकारी कार्यालय ही दोन्ही कार्यालये सध्या एका भाड्याच्या खोलीत सुरू असून कर्मचारी वर्गाला त्याचे लेखी दस्तऐवज अभिलेख नोंद रजिस्टर ठेवायला जागा अपुरी पडत आहे. तर नागरिकांना देखील येथे जागे अभावी बसण्याची सोय नसल्याने ज्येष्ठ नागरिक महिला यांना त्रास सहन करावा लागत आहे. खारेपाटण येथे नवीन तलाठी व सर्कल कार्यालयाच्या स्वतंत्र इमारती झाल्यास प्रशासकीय कार्यवाहीला गती मिळणार आहे. नवीन कार्यालयामुळे परिसरातील नागरिकांना महसूल विभागाच्या विविध सेवा अधिक सुलभ व जलद गतीने उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

सध्या खारेपाटण मंडळ अधिकारी कार्यालय अंतर्गत एकूण ४ तलाठी सजा कार्यालये येत असून एकूण १३ महसूल गावांचा यामध्ये समावेश आहे.

error: Content is protected !!