चिंदरचे सुपुत्र डॉ. केतनकुमार खोत यांचा राष्ट्रीय आरोग्य अभियानात गौरव..!

लोहाच्या कमतरतेमुळे होणाऱ्या रक्तक्षयाविरोधातील देशव्यापी IDA Pledge Campaign मध्ये सहभाग

आचरा (प्रतिनिधी) : चिंदर गावचे सुपुत्र तथा सध्या गोवा येथे वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉ. केतनकुमार हेमांगी प्रकाश खोत यांना देशव्यापी IDA Pledge Campaign मध्ये सहभागी झाल्याबद्दल प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. लोहाच्या कमतरतेमुळे होणाऱ्या रक्तक्षयाविरोधात (Iron Deficiency Anemia) जनजागृती आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात आली.

या महत्त्वपूर्ण अभियानाच्या माध्यमातून Danone India ने Asia Book of Records मध्ये ‘लोहाच्या कमतरतेमुळे होणाऱ्या रक्तक्षयाचा सामना करण्यासाठी सर्वाधिक आरोग्यसेवा व्यावसायिकांनी घेतलेली प्रतिज्ञा’ या विक्रमाची नोंद केली आहे.

८ नोव्हेंबर २०२५ ते ८ डिसेंबर २०२५ या कालावधीत देशभरातील तब्बल २० हजार ९११ आरोग्यसेवा व्यावसायिकांनी (HCPs) लोहाच्या कमतरतेमुळे होणाऱ्या रक्तक्षयाविरोधात लढण्याची प्रतिज्ञा घेतली. या उपक्रमाचा उद्देश रक्तक्षयाचे लवकर निदान, पोषणाबाबत जनजागृती तसेच पुराव्यावर आधारित उपचारपद्धतींना प्रोत्साहन देणे हा होता.

या अभियानात सहभागी होत डॉ. केतनकुमार खोत यांनी रक्तक्षयाविरोधातील जनजागृती आणि आरोग्यविषयक सकारात्मक संदेश पुढे नेण्यासाठी योगदान दिले. या उपक्रमातून अधिक सक्षम, निरोगी आणि रक्तक्षयमुक्त भारत घडविण्याच्या प्रयत्नांना बळ मिळाले.

या विक्रमाची ११ डिसेंबर २०२५ रोजी अधिकृतपणे नोंद करण्यात आली. चिंदरच्या सुपुत्राने राष्ट्रीय स्तरावरील आरोग्य अभियानात सहभाग नोंदवत गावाचे नाव उज्ज्वल केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

error: Content is protected !!