उत्कृष्ट धान्य वितरणातून पाडलोस सोसायटीचा गौरव

बांदा (प्रतिनिधी) : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत लाभार्थ्यांना धान्याचे वितरण करताना उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पाडलोस विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचा जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला. सोसायटीचे रास्त भाव धान्य दुकानदार मयुरी कुबल यांनी हा सन्मान स्वीकारला. जिल्ह्यातील इतर धान्य दुकानदारांचाही सन्मान करण्यात आला.

पाडलोस सोसायटीने एप्रिल, मे व जून २०२६ या तीन महिन्यांत आगाऊ धान्याचे १०० टक्के वितरण वेळेत पूर्ण केले. या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत जिल्हा प्रशासनाने सोसायटीचे कौतुक केले आहे. लाभार्थ्यांना शासनाच्या योजनेचा लाभ वेळेत आणि सुरळीत मिळावा, यासाठी सोसायटीने केलेले कार्य निश्चितच प्रेरणादायी ठरले आहे. यावेळी सावंतवाडी पुरवठा विभागाचे कमलेश ठाकूर उपस्थित होते.

प्रशासनाने केलेला हा गौरव सोसायटीच्या कार्याला नवी ऊर्जा देणारा ठरला असून, भविष्यातही उत्कृष्ट सेवा देण्याचा निर्धार सोसायटीने व्यक्त केला आहे.

दरम्यान, हा सन्मान केवळ सोसायटीचा नसून, लाभार्थ्यांना वेळेत व पारदर्शकपणे धान्य उपलब्ध करून देण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या प्रत्येक घटकाचा आहे. शासनाच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी पाडलोस सोसायटी यापुढेही अधिक जबाबदारीने कार्यरत राहील. या गौरवामुळे आमच्या कार्याला निश्चितच नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली आहे, अशी प्रतिक्रिया पाडलोस विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे व्हाइस चेअरमन विश्वनाथ नाईक यांनी व्यक्त केली.

error: Content is protected !!