खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभाग (DLLE) यांच्या ‘अन्नपूर्णा योजना’ अंतर्गत जिल्ह्यातील खारेपाटण येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉलचा उपक्रम उत्स्फूर्तपणे राबविण्यात आला.
शुक्रवार, दि. २१ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित या उपक्रमात ५२ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी घावण-चटणी, पाणीपुरी, चायनीज भेळ, सँडविच, गुलाबजाम, चुरमुरे भेळ, मोनाको चाट व स्प्रिंग पोटॅटो आदी खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारून त्यांची विक्री केली.
या कार्यक्रमासाठी शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. संजय सानप हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उपक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आत्माराम कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनात आजीवन अध्ययन व विस्तार विभाग प्रमुख श्रीमती नमिरा मुजावर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. विद्यार्थ्यांनी नियोजन, पदार्थनिर्मिती, स्टॉल सजावट, विक्री व आर्थिक व्यवहाराची जबाबदारी स्वतः पार पाडली.
या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा उपक्रम यशस्वी ठरला असून, विद्यार्थ्यांना नियोजन, व्यवस्थापन, सांघिक कार्य, संवादकौशल्य व उद्योजकतेचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला.












