छात्रौ की गूज लाईव्ह टेलिकास्टला कणकवलीत उत्स्फूर्त प्रतिसाद

कणकवली (प्रतिनिधी) : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पुणे येथे पार पडलेल्या ‘छात्रों की गुंज’ या विशेष संवाद कार्यक्रमाचे शनिवारी, २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता कणकवली शहरात थेट प्रक्षेपण करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस आणि कणकवली तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पूज्य आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे मोठ्या एलईडी स्क्रीनवर हे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले. या उपक्रमाला शहरातील नागरिक, तरुण-तरुणी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

पुणे येथील या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी ‘जेन-झी’ म्हणजेच आजच्या युवा वर्गाशी थेट संवाद साधला. देशातील विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना योग्य व्यासपीठ मिळावे, विशेषतः विद्यार्थिनींचे हक्क, त्यांची सुरक्षा, समान संधी आणि शिक्षणाशी संबंधित गंभीर समस्यांवर राष्ट्रीय पातळीवर आवाज उठवला जावा, या उद्देशाने राहुल गांधी यांनी हा संवाद आयोजित केला होता. पुण्यातील या महत्वपूर्ण उपक्रमाला कणकवलीतून पाठिंबा दर्शवण्यासाठी आणि राहुल गांधींचे विचार तळागाळातील तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी या लाईव्ह प्रक्षेपणाचे आयोजन करण्यात आले असल्याचे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

पटवर्धन चौकातील मोठ्या पडद्यावर हे प्रक्षेपण सुरू होताच सायंकाळच्या वेळी तेथून जाणाऱ्या पादचाऱ्यांनी, व्यापाऱ्यांनी आणि विशेषतः युवा वर्गाने राहुल गांधींचे विचार ऐकण्यासाठी गर्दी केली होती. शिक्षण, रोजगार आणि युवा हक्कांवर झालेल्या या चर्चेने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या प्रक्षेपणाच्या यशस्वी आयोजनासाठी कणकवली तालुका काँग्रेस व जिल्हा काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.

error: Content is protected !!