अन्नपूर्णा योजनेतून विद्यार्थ्यांच्या कौशल्यांना मिळाले व्यासपीठ
खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभाग (DLLE) यांच्या ‘अन्नपूर्णा योजना’ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉलचा उपक्रम नुकताच शुक्रवार दि.२१ ऑगस्ट २०२६ रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. डी कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली उत्स्फूर्तपणे राबविण्यात आला.
खारेपाटण महाविद्यालयात राबविण्यात आलेल्या या उपक्रमात ५२ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी घावण-चटणी, पाणीपुरी, चायनीज भेळ, सँडविच, गुलाबजाम, चुरमुरे भेळ, मोनाको चाट व स्प्रिंग पोटॅटो आदी खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारून त्यांचे प्रदर्शन मांडून त्यांची विक्री देखील केली.
तर या कार्यक्रमासाठी शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य संजय सानप हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या उपक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आत्माराम कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनात आजीवन अध्ययन व विस्तार विभाग प्रमुख नमिरा मुजावर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. विद्यार्थ्यांनी नियोजन, पदार्थनिर्मिती, स्टॉल सजावट, विक्री व आर्थिक व्यवहाराची जबाबदारी स्वतः पार पाडली.
या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा उपक्रम यशस्वी ठरला असून, विद्यार्थ्यांना नियोजन, व्यवस्थापन, सांघिक कार्य, संवादकौशल्य व उद्योजकतेचा प्रत्यक्ष अनुभव यानिमित्ताने मिळाला.












