नागरिकांच्या विविध समस्या व प्रलंबित कामांची 350 हुन अधिक निवेदने स्वीकारली
सावंतवाडी (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व आमदार रवींद्रजी चव्हाण यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘सेवा अभियानाला’ सावंतवाडीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. काझी शहाबुद्दीन हॉल, सावंतवाडी येथे आयोजित या अभियानात भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या विविध समस्या व प्रलंबित विकासकामांची निवेदने सादर केली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी प्रलंबित कामांची निवेदने भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यांच्या नावाने सादर केली. या निवेदनांची दखल घेत महाराष्ट्र विधान परिषद सदस्य, भाजप कोकण विभागाचे संयोजक तथा भाजप महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता श्री. प्रमोद जठार आणि श्री. संतोष साखरे यांनी नागरिकांची निवेदने स्वीकारली.
या वेळी नागरिकांनी रस्ते, पायाभूत सुविधा, स्थानिक विकासकामे तसेच विविध शासकीय प्रश्नांबाबत आपल्या समस्या मांडल्या. नागरिकांच्या प्रश्नांची माहिती जाणून घेत संबंधित समस्या शासनाच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.
या सेवा अभियानामुळे सर्वसामान्य नागरिकांना आपल्या समस्या थेट भाजपच्या पदाधिकाऱ्यांसमोर मांडण्याची संधी मिळाली. नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत त्यांचे निराकरण करण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जातील, अशी भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, संतोष साखरे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, युवा नेते विशाल परब, जिल्हा उपाध्यक्ष संदीप गावडे, जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, मंडळ अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, मनोज नाईक, नगरसेवक आनंद नेवगी, प्रतीक बांदेकर, इपाली भालेकर, मधुसूदन देसाई, संतोष राऊळ यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सेवा अभियानाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या थेट पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहोचवून त्या सोडविण्यासाठी प्रभावी पाठपुरावा करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.












