आक्षेपार्ह आढळले नाही मात्र केळीचे नमुने घेतले तपासणीसाठी
कणकवली (प्रतिनिधी) : केमिकलमध्ये फळे पिकवून फळांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई चा इशारा अलीकडेच पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला होता. याअनुषंगाने एफडीएचे सहाय्यक आयुक्त ललित गायकवाड व सहकारी अधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी 7 वाजता कणकवली शहरातील एका घाऊक फळविक्रेत्याच्या वखारीची पाहणी केली. सहाय्यक आयुक्त गायकवाड यांच्यासोबत अन्न सुरक्षा अधिकारी तेजश्री ताजणे, किरण गावित उपस्थित होते. या वखारीतील केळी च्या साठ्याची पाहणी करून तपासणी केली. तपासणीदरम्यान वखारीमध्ये आक्षेपार्ह केमिकल अथवा अन्य कोणत्याही वस्तू किंवा आरोग्याला हानिकारक फळं आढळली नाही, मात्र वखारी मध्ये आढळलेल्या केळी चे नमुने लॅब तपासणीसाठी घेतल्याची माहिती एफ.डी.ए च्या अधिकाऱ्यांनी दिली. नफा कमविण्यासाठी केमिकल मध्ये फळे पिकवून त्याची विक्री करून जनतेच्या आरोग्याशी खेळले जात असल्याचा संशय असल्यावरून फळविक्रेत्यांच्या वखारीची तपासणी केली जात असल्याने कणकवलीत खळबळ उडाली आहे.













