गावाच्या लोकसंख्येचा विचार करूनच खरेदी झाली होती का? दोषींवर कारवाई होणार का; ग्रामस्थांचा सवाल
चिंदर (प्रतिनिधी) : चिंदर ग्रामपंचायत परिसरात गेल्या महिनाभरापासून मुदत संपलेल्या मेडीक्लोरच्या बाटल्यांचा मोठा खच पडून असल्याचे निदर्शनास आले आहे. एका बाटलीची किंमत सुमारे ७० रुपये असल्याचे बाटलीवर नमूद असून, अशा शेकडो बाटल्या उघड्यावर टाकून देण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
मेडीक्लोरच्या या बाटल्या नेमक्या किती प्रमाणात खरेदी करण्यात आल्या? गावाची लोकसंख्या आणि प्रत्यक्ष गरज लक्षात घेऊनच त्यांची खरेदी करण्यात आली होती का? तसेच या बाटल्या मुदत संपण्यापूर्वी गावातील नागरिकांपर्यंत पोहोचल्या नाहीत का, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
जर ग्रामस्थांच्या वापरासाठी या बाटल्या खरेदी करण्यात आल्या होत्या, तर त्यातील शेकडो बाटल्या मुदतबाह्य होईपर्यंत पडून कशा राहिल्या, याची चौकशी होणे गरजेचे असल्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. सार्वजनिक निधीतून खरेदी झालेल्या वस्तूंची अशा प्रकारे नासाडी होत असेल, तर त्याची जबाबदारी निश्चित करून संबंधित दोषींवर कारवाई केली जाणार का, असा सवालही जनतेतून उपस्थित केला जात आहे.
एका बाटलीची किंमत सुमारे ७० रुपये असताना शेकडो बाटल्या मुदत संपल्यानंतर फेकून देण्यात आल्याने ग्रामपंचायतीच्या निधीचा मोठ्या प्रमाणात अपव्यय झाला आहे का, याचीही तपासणी होणे आवश्यक आहे.
मुदतबाह्य बाटल्यांची खरेदी, साठवणूक आणि विल्हेवाट याबाबत ग्रामपंचायतीने स्पष्ट माहिती द्यावी, तसेच संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.














