YHAI बोरिवली युनिटचा ‘निसर्ग मंगळागौर पर्व दुसरे’ उत्साहात संपन्न
खारेपाटण (प्रतिनिधी) : आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीत स्वतःसाठी काही क्षण काढणे किती गरजेचे आहे, याची सुंदर अनुभूती देणारा ‘निसर्ग मंगळागौर पर्व दुसरे’ हा आगळावेगळा उपक्रम युथ हॉस्टेल्स असोसिएशन ऑफ इंडिया (YHAI), बोरिवली युनिटच्या वतीने अर्नाळा येथील सी बीच रिसॉर्ट येथे २२ ऑगस्ट २०२६ रोजी उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. तर संपूर्ण मुंबईतून जवळपास ७० महिलांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.
मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांना, गाण्यांना आणि संस्कृतीला आधुनिक काळातील मैत्री, आनंद आणि निसर्गाच्या सहवासाची जोड देत या कार्यक्रमाने उपस्थित महिलांना काही काळ आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनातून बाहेर पडून मनमुराद आनंद लुटण्याची संधी दिली.‘स्वतःसाठी वेळ देणे हेही आयुष्याचे एक महत्त्वाचे टॉनिक आहे’ हा संदेश या कार्यक्रमातून प्रभावीपणे अधोरेखित झाला. एकत्र येणे, मनसोक्त हसणे, आपले बालपण पुन्हा जगणे आणि आपल्या समृद्ध पारंपरिक संस्कृतीशी नाते जोडणे, हीच खऱ्या अर्थाने आनंदी जीवनाची ऊर्जा आहे, याची प्रचिती या कार्यक्रमातून आली.
या कार्यक्रमाला YHAI महाराष्ट्र ब्रांचच्या चेअरमन लक्ष्मी मोर्डेकर यांची विशेष उपस्थिती लाभली. गेल्या दोन वर्षांत आपल्या कार्याची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या YHAI बोरिवली युनिटच्या महिला- केंद्रित उपक्रमांचे त्यांनी मनापासून कौतुक केले. महिलांना एकत्र आणून त्यांना आनंदाचे, मैत्रीचे आणि सर्जनशीलतेचे व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या उपक्रमाला उपस्थितांकडूनही भरभरून दाद मिळाली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये कार्यक्रमाच्या लीडर स्नेहल नारकर आणि स्वाती शिरोडकर, सारिका केलेंबकर, भक्ती जामसूतकर, मेघना मंत्री, राजेश गांधी, सुदेश नारकर, यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या नियोजनबद्ध सहभागामुळे संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि संस्मरणीय ठरला.युनिटचे चेअरमन विलास घोसाळकर आणि सेक्रेटरी मनोज शिरोडकर यांच्या नेतृत्वाखाली महिलांसाठी पारंपरिक संस्कृती जपत आनंदाचा श्वास घेण्याची संधी देणारा हा उपक्रम आयोजित करण्यात आला. YHAI बोरिवली युनिटने गेल्या दोन वर्षांत विविध सामाजिक, सांस्कृतिक, साहसी आणि मनोरंजनात्मक उपक्रमांच्या माध्यमातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्याच वाटचालीतील ‘निसर्ग मंगळागौर पर्व दुसरे’ हा एक महत्त्वाचा आणि कौतुकास्पद टप्पा ठरला.
मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांमधून बालपणाच्या आठवणींना उजाळा देत, मैत्रीचे नवे बंध निर्माण करत आणि संस्कृतीचा वारसा जपत महिलांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला. आनंद, संस्कृती, निसर्ग आणि महिला सक्षमीकरणाचा सुंदर संगम घडवून आणणारा ‘निसर्ग मंगळागौर पर्व दुसरे’ हा कार्यक्रम सहभागी महिलांच्या कायम स्मरणात राहील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
YHAI बोरिवली युनिटच्या या उपक्रमाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, महिलांसाठी अशाच प्रकारचे नाविन्यपूर्ण आणि संस्कृती जपणारे उपक्रम भविष्यातही सातत्याने आयोजित करण्याचा युनिटचा मानस आहे.












