पालकमंत्र्यांच्या निर्देशानंतर हळवल ब्रिज जोडरस्ता भूसंपादनासाठी महसूल विभागाकडे पिडब्ल्यूडी चा प्रस्ताव

कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुल यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे सादर केला प्रस्ताव

भूसंपादनासाठी 4 कोटींची तरतूद, 75 लाख महसूलकडे जमा ; खाजगी दराने होणार भूसंपादन

सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : गेली अनेक वर्षे रेंगाळलेल्या हळवल रेल्वे फाटकाच्या फ्लायओव्हर चा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सुधारित अलायमेंटनुसार पालकमंत्री नितेश राणे यांनी भूसंपादन करण्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव महसूल विभागाकडे तातडीने सादर करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना 21 ऑगस्ट रोजीच्या बैठकीत दिले होते. पालकमंत्री नितेश राणे यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात सुमारे चार कोटी इतकी भरीव रक्कम या भूसंपादनासाठी मंजूर केली आहे. त्यापैकी 75 लाख रुपये अनामत रक्कम म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने महसूल विभागाकडे भूसंपादनाकरिता वर्ग केली आहे.

पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली चे कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुल यांनी सोमवारी 24 ऑगस्ट रोजी हळवल फाटा रेल्वे उड्डाणपुलासाठी आवश्यक भूसंपादनाचा परिपूर्ण प्रस्ताव कणकवली उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्याकडे सादर केला. प्राथमिक आवश्यकतेनुसार 46 गुंठे जमीन सुरुवातीला भूसंपादीत केली जाणार आहे.

हळवल फाटा येथील रेल्वे फाटका जवळील उड्डाणपूल सुमारे सन 2014 पासून बांधून पोचमार्ग नसल्याने विना वापर पडून आहे. दुतर्फा जोडरस्ता करण्याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी महत्वपूर्ण बैठक आयोजित केली होती. या बैठकीला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, भूसंपादन अधिकारी, स्थानिक बाधित होणारे जमीनमालक व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री नितेश राणे यांनी या बैठकीत 12 वर्षाहून अधिक दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या हळवल रेल्वे फाटक उड्डाणपूल जोडरस्त्यासाठी आवश्यक भूसंपादन प्रस्तावावर प्रशासकीय यंत्रणेने तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देत देऊन 24 ऑगस्टपर्यंत भूसंपादन प्रस्ताव महसूल विभागाकडे सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज सोमवार 24 ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुल यांनी कणकवली प्रांताधिकारी जगदीश कातकर यांची भेट घेऊन हळवल रेल्वेउड्डाणपुला च्या जोडरस्त्याकरिता करिता थेट खाजगी वाटाघाटीने भूसंपादन करण्याचा प्रस्ताव सादर केला. हळवल रेल्वे उड्डाणपूल च्या दुतर्फा जोडरस्त्याच्या कामाकरिता म खासदार नारायण राणे स यांनी सुमारे वीस कोटी इतकी रक्कम केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत मंजूर करण्याकरिता केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना शिफारस केली आहे. त्यामुळे सुमारे 14 वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर हळवल फाटका वरील रेल्वे उड्डाणपुलाच्या जोडरस्त्याचे काम शीघ्रगतीने मार्गी लागेल अशी आशा निर्माण झाली आहे.

error: Content is protected !!