शिक्षक कार्यकर्त्यांना संघटनात्मक बळ

कोकण विभागीय प्रशिक्षण शिबिर २६ ऑगस्टला ओरोस येथे; पाच जिल्ह्यांतील पदाधिकारी होणार सहभागी

ओरोस (प्रतिनिधी) : प्राथमिक शिक्षकांच्या संघटनात्मक चळवळीला अधिक बळ देतानाच शाळा, विद्यार्थी आणि शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे कोकण विभागीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर बुधवारी (ता. २६) सिंधुदुर्गनगरी-ओरोस येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर या पाच जिल्ह्यांतील तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरीय पदाधिकारी सहभागी होणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष तथा शिक्षक समितीचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्या कै. द. सि. सामंत गुरुजी सभागृहात सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत हे शिबिर होणार आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सिंधुदुर्ग शाखेला या शिबिराच्या आयोजनाची संधी मिळाली असून राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर आणि कोकण विभागप्रमुख रूपेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले आहे.

पत्रकार परिषदेला राज्य कार्यकारिणी सदस्य सचिन मदने, नामदेव जांभवडेकर, जिल्हा सरचिटणीस तुषार आरोसकर, पतपेढी संचालक नारायण नाईक, चंद्रसेन पाताडे, जिल्हा पदाधिकारी आपा सावंत आदी उपस्थित होते.

शिबिराचे उद्घाटन राज्य शिक्षक नेते उदय शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. राज्याध्यक्ष विजय कोंबे, राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर, राज्य उपाध्यक्ष राजन सावंत, आनंदा कांदळकर, विलास कंटेकुरे, राज्य कार्याध्यक्ष सह्याजी पाटील, राज्य कोषाध्यक्ष नंदकुमार होळकर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. राज्य कार्यालयीन चिटणीस किशोर पाटील, राज्य ऑडिटर अंकुश गोफणे, राज्य कार्यकारिणी सदस्य सचिन मदने, नामदेव जांभवडेकर, विलास जाधव, अनिल नागोठकर, सिंधुदुर्ग पतपेढी अध्यक्ष सिताराम लांबर, जुनी पेन्शन आघाडीप्रमुख शंकर वजराटकर यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

शिबिरात ‘शासन निर्णय मार्गदर्शन’ या विषयावर विजय कोंबे, ‘संघटनेतील कार्यकर्ता कसा असावा’ या विषयावर गोपाळ सुरे, ‘शिक्षक समिती आणि चळवळ’ या विषयावर उदय शिंदे, तर ‘अशी घडली शिक्षक समिती’ या विषयावर चंद्रकांत अणावकर मार्गदर्शन करणार आहेत. ‘शिक्षक व शालेय कामकाजाबाबत जागरूकता’ या विषयावर दिनकर तळवणेकर संवाद साधणार आहेत. संघटनात्मक प्रश्नांवर प्रश्नोत्तर आणि मुक्त संवादाचे सत्रही होणार आहे.

सकाळी साडेनऊपासून नावनोंदणी व चहापान होईल. साडेदहा वाजता उद्घाटन सोहळ्याला सुरुवात होणार असून स्वागताध्यक्ष विठ्ठल गवस मनोगत व्यक्त करतील. कोकण विभागप्रमुख रूपेश जाधव प्रास्ताविक करतील, तर राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर शुभेच्छापर मार्गदर्शन करणार आहेत. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर आणि ठाणे जिल्हाध्यक्षही यावेळी आपली भूमिका मांडणार आहेत. कोकण विभागातील शिक्षक समितीचे सर्व तालुकाध्यक्ष, सचिव, जिल्हा व राज्य कार्यकारिणी पदाधिकारी, सदस्य तसेच महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

error: Content is protected !!