गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बांद्यात वाहतूक व सुरक्षेचे नियोजन

बांदा (प्रतिनिधी) : आगामी गणेशोत्सव, गोपाळकाला व ईद-ए-मिलाद हे सण शांततेत व उत्साहात पार पडावेत, यासाठी बांदा पोलिस ठाण्यात आज सकाळी नियोजन बैठक संपन्न झाली. सावंतवाडीचे नूतन उपविभागीय पोलिस अधिकारी राजेश भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत शहरातील वाहतूक कोंडी, पार्किंग व्यवस्था, एकदिशा मार्गाची अंमलबजावणी तसेच उत्सव काळातील कायदा व सुव्यवस्थेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बांदा ग्रामपंचायत प्रशासन, शांतता समिती, मोहल्ला समिती, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, दहीहंडी मंडळे, व्यापारी व ग्रामस्थ यांच्या सहभागातून ही बैठक झाली. गणेशोत्सव काळात शहरात मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी चौकाचौकात वाहतूक पोलिसांची नियुक्ती, आवश्यक ठिकाणी बॅरिकेट्स लावणे, नो-पार्किंग झोन निश्चित करणे तसेच पे-अँड-पार्कच्या जागा उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

माटवी बाजार दोन दिवस अगोदर भरत असल्याने त्या काळात वाढणारी वाहतूक व नागरिकांची गर्दी लक्षात घेऊन स्वतंत्र वाहतूक नियोजन करण्यावरही चर्चा झाली. पार्किंगसाठी खेमराज हायस्कूलचे मैदान उपलब्ध करून घेण्याबाबत तसेच बांदा उड्डाणपुलाखालील वाहतुकीचे योग्य नियोजन करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गांवर एकदिशा वाहतूक व्यवस्था प्रभावीपणे राबविण्याबाबत पोलिस प्रशासनाने सूचना दिल्या.

उत्सव काळात वाहतूक कोंडी होऊ नये तसेच नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी व्यापारी, ग्रामस्थ आणि उत्सव मंडळांनी पोलिस प्रशासनास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्व घटकांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी राजेश भागवत यांनी केले. उत्सव कालावधीत बांदा शहरात आजूबाजूच्या 30 ते 40 गावातील ग्रामस्थ खरेदीसाठी येतात. यामध्ये गोवा राज्यातील ग्राहकांचा मोठया संख्येने समावेश असतो.

यावेळी बांदा सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच रत्नाकर आगलावे, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष भाऊ वाळके, माजी जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर, माजी उपसभापती शीतल राऊळ, माजी सरपंच बाळा आकेरकर, ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर, आबा धारगळकर, अरुणा सावंत, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अन्वर खान, माजी तंटामुक्ती अध्यक्ष गुरुनाथ सावंत, तंटामुक्ती समिती अध्यक्ष संदेश पावसकर, आसिफ शेख, प्रसाद वाळके, शैलेश केसरकर, उदय येडवे, सर्वेश गोवेकर, रियाज खान, नीलेश कदम, विठ्ठल वाळके, लकरकोट दत्तमंदिर समिती अध्यक्ष सुशांत पांगम, जुबेर शेख, मंगलदास साळगावकर, अस्लम खतीब, शहीद शेख, सुनील माजगावकर, सचिन वीर, साहिल खान, दिलवान शेख, कुतूबुद्दीन शेख, आपा कोचरेकर, निखिल मयेकर, जहूर शेख आदी उपस्थित होते.

बांदा सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज शिंदे यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

error: Content is protected !!