सिंधुदुर्गनगरीं (प्रतिनिधी) : मागील २० महिने वेतन न मिळाल्याने हतबल झालेल्या वाडा हायस्कूलचे वरिस्ट लिपिक प्रमोद सोनकुसरे यांनी आजपासून जिल्हा परिषद समोर उपोषण सुरू केले आहे . तर जाणीवपूर्वक वेतनापासून वंचित ठेवणाऱ्या अधिक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (माध्यमिक )यांच्यावर कारवाई करावी. अशी मागणी केली आहे.
प्रमोद सोनकुसरे हे अपंग कर्मचारी असून देवगड तालुक्यातील वाडा येथील हायस्कूलमध्ये वरिष्ठ लिपिक (अधिसंख्य) पदावर गेली अनेक वर्ष कार्यरत आहेत. मात्र त्यांना गेली २० महिने वेतन मिळालेले नाही याबाबत त्यांनी प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही अद्याप त्यांना वेतन मिळालेले नाही. यामुळे त्यांची उपासमार होत असून मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. माध्यमिक विभागाकडे वारंवार फेऱ्या मारूनही या विभागाकडून सोनकुसरे यांना वेतन मिळावे यासाठी कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत. प्रत्येक वेळी कोणते ना कोणते कारण पुढे करत वेळ काढू धोरण अवलंबले जात आहे. यामुळे प्रमोद सोनकुसरे हतबल झाले असून त्यांनी पुन्हा एकदा जिल्हा परिषदेसमोर आपल्या पत्नीसमवेत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. सोनकुसरे यांनी आजपासून जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केले असून आपले २० महिने थकीत असलेले वेतन तात्काळ मिळावे. तसेच अपंग कर्मचाऱ्यास मागील वीस महिन्याच्या वेतनापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवून कुटुंबीयांच्या उपासमारीस कारणीभूत असणाऱ्या अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (माध्यमिक) सिंधुदुर्ग यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. अशी मागणी प्रशासनाकडे त्यांनी केली आहे.
ॉ तसेच जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील. असा निर्धार त्यांनी केला आहे.









