नक्षत्र स्वप्निल चिंदरकर प्रथम; कौस्तुभ पासकर द्वितीय, यशश्री चेंदवणकर तृतीय
आचरा (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंदर कुंभारवाडी येथे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याबरोबरच पारंपरिक कला व पर्यावरणपूरकतेचा संदेश देण्यासाठी ‘फुलांची रांगोळी स्पर्धा सन २०२६-२७’ उत्साहात आयोजित करण्यात आली.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध रंगांची फुले, पाने व नैसर्गिक साहित्याचा कल्पकतेने वापर करून आकर्षक रांगोळ्या साकारल्या. विद्यार्थ्यांच्या कल्पकता, सर्जनशीलता, रांगोळीची रचना व मांडणी, फुलांची रंगसंगती, स्वच्छता तसेच आकर्षकता व सौंदर्य या निकषांवर स्पर्धेचे परीक्षण करण्यात आले.
या स्पर्धेत इयत्ता पाचवीतील नक्षत्र स्वप्निल चिंदरकर हिने प्रथम क्रमांक पटकावला. इयत्ता चौथीतील कौस्तुभ निलेश पासकर याने द्वितीय क्रमांक, तर इयत्ता चौथीतील यशश्री संदेश चेंदवणकर हिने तृतीय क्रमांक मिळविला. तिसरीतील तक्षश्री प्रसाद चिंदरकर हिने उत्तेजनार्थ, तर साक्षी अमोल पारकर हिने पाचवा क्रमांक मिळविला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये कलात्मक दृष्टी, सर्जनशीलता, स्वच्छतेची जाणीव आणि भारतीय पारंपरिक कलेविषयी आवड निर्माण होण्यास मदत झाली. स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने शिक्षक संजय जाधव व अरुण आडे यांच्यावतीने कौतुक करण्यात आले.










