फोंडाघाट (प्रतिनिधी) : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्या रावे कार्यक्रमांतर्गत कृषी सम्राट गटामार्फत लोरे नं. २, वैभववाडी येथे पेरू पिकामध्ये एअर लेयरिंग (गुटी कलम) या शाकीय प्रसारण पद्धतीचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. या प्रात्यक्षिकाद्वारे शेतकऱ्यांना निवडक व निरोगी मातृवृक्षापासून गुणधर्म कायम ठेवणारी, एकसमान व दर्जेदार रोपे तयार करण्याची वैज्ञानिक पद्धत प्रत्यक्ष दाखवून देण्यात आली.
प्रात्यक्षिकामध्ये प्रथम पेरूच्या झाडावरील निरोगी व परिपक्व फांदीची निवड करण्यात आली. त्यानंतर फांदीवरील साल काढून योग्य ठिकाणी रिंग तयार करण्यात आली व मुळांची वाढ प्रोत्साहित करण्यासाठी रूटिंग हार्मोनचा वापर करण्यात आला. जखमी भागाभोवती ओलसर कोकोपीट भरून त्यावर पॉलिथिन घट्ट बांधण्यात आले, जेणेकरून आवश्यक आर्द्रता टिकून राहील. तसेच पुरेशी मुळे विकसित झाल्यानंतरच गुटी मातृवृक्षापासून वेगळी करून रोपवाटिकेत लागवड करावी, याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमाचे मार्गदर्शन कृषी संशोधन केंद्र, फोंडाघाट यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यामध्ये वेदांत घाग, स्वयंभू प्रभुदेसाई, प्रतीक चौधरी, सिद्धांत शिंदे, आर्यन सावळे, निखिल नागर, करण बन्ने, आदित्य प्रभुदेसाई, रीशल मस्केरेन्हस व आशिम कुमार महंती यांनी सहभाग घेतला.











