‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या!’च्या जयघोषात गौरी-गणपतींना भक्तिभावाने निरोप

वैभववाडी (प्रतिनिधी) : ‘गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया… पुढच्या वर्षी लवकर या!’च्या जयघोषात, ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करीत तालुक्यात गौरी-गणपतींचे शनिवारी भक्तिमय वातावरणात उत्साहात विसर्जन करण्यात आले. मिरवणुकांमध्ये अबालवृद्धांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.गावागावात गणपती घाटावर सायंकाळी उशिरापर्यंत विसर्जन सुरु होते. विसर्जन दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वैभववाडी पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त लावला होता.

गेल्या सहा दिवसांपासून घराघरांत गणरायाच्या आगमनाने मंगलमय आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. सहाव्या दिवशी शनिवारी दुपारनंतर तालुक्यातील विविध गावांमध्ये गणपती विसर्जनाच्या मिरवणुका काढण्यात आल्या. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी महिला, पुरुष, तरुणांसह लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकही मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.विसर्जन मिरवणुकीदरम्यान ढोल-ताशांच्या गजराने आणि गणपती बाप्पाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. अनेक ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करण्यात आली. पारंपरिक वाद्यांच्या तालावर गणेशभक्तांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

गणेश घाटावर पोहोचल्यानंतर गणपती बाप्पांची आरती, सामुदायिक पूजा-अर्चा करण्यात आली. आपल्या मनातील इच्छा पूर्ण व्हाव्यात, यासाठी अनेक भाविकांनी बाप्पाला श्रद्धेने नवसही बोलला. त्यानंतर भाविकांनी जड अंतःकरणाने आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला.
‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या!’ अशा जयघोषात गौरी-गणपतींचे विसर्जन करण्यात आले. बाप्पाच्या निरोपाच्या क्षणी अनेक भाविक भावूक झाल्याचे चित्र विविध विसर्जनस्थळी पाहायला मिळाले.

error: Content is protected !!