*वैभववाडी (प्रतिनिधी) :* गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर वाभवे वैभववाडी नगरपंचायतीने नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत शहरातील तीनही गणेश घाटांवर साफसफाई करून आवश्यक सोयी-सुविधांसह सुरक्षा साहित्याची व्यवस्था केली आहे. विसर्जनाच्या वेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये, तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत व बचावकार्य करता यावे, यासाठी नगरपंचायत प्रशासनाकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. अशी माहिती नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे यांनी दिली आहे.
वैभववाडी शहरातील गणेश विसर्जनासाठी मोठ्या संख्येने नागरिक घाटांवर येत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सेफ्टी जॅकेट, सेफ्टी रिंग आणि सेफ्टी रोप उपलब्ध करून देण्यात आले आहेत. संभाव्य दुर्घटनेच्या वेळी बचाव पथकाला तातडीने कार्यवाही करता यावी, यासाठी हे सुरक्षा साहित्य घाटांवर सज्ज ठेवण्यात येणार आहे. याशिवाय गणेश विसर्जनाची प्रक्रिया सुरळीत पार पडावी, नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये आणि गर्दीच्या वेळी सुरक्षित वातावरण राहावे, यासाठी नगरपंचायतीच्या वतीने आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. विसर्जनासाठी येणाऱ्या गणेशभक्तांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, पाण्यात उतरताना विशेष काळजी घ्यावी आणि सुरक्षेच्या दृष्टीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांचा वापर करावा, असे आवाहन नगरपंचायत प्रशासनाने केले आहे.
गणेशोत्सवाचा उत्साह कायम ठेवत विसर्जन सोहळा शांततामय, सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडावा, यासाठी नगरपंचायत प्रशासन सज्ज झाले आहे. अशी माहिती नगराध्यक्षा रावराणे यांनी दिली आहे.












